उद्योग आणि शेतीची सांगड घालण्याची गरज- मुख्यमंत्री
बिडकीन येथे ५०० एकर वर आपण अन्न प्रक्रिया उद्योग उभारणार
औरंगाबाद : उद्योग आणि शेतीची सांगड घालण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. औरंगाबाद येथे उद्योजकांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. बिडकीन येथे ५०० एकर वर आपण अन्न प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. त्यात महिलांना आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. जून २०२० मध्ये याचे भूमिपूजन करणार असून वेळ न दवडता काम करणार असल्याचे ते म्हणाले.
जिथे यांत्रिकिकरण होतंय त्याच स्वागत आहे. पण भूमीपुत्रांना कष्टाचे दोन घास मिळावे ही जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी असे झाले तर महाराष्ट्र महाशक्ती बनवण्याचे काम हे सरकार करेल असेही ते म्हणाले.
सरकार स्थापन करण्यासाठी खूप अडचणी होत्या. अडचणींवर मात करत सरकार स्थापन केले. उद्योगांनाही अडचणींवर मात करावी लागेल.अनेक प्रोजक्ट आपल्याकडे येतायत पण त्यात काम कोण करणार ? जे उद्योग येतात, त्यात काम करणारे कामगार टीकवण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. उद्योजकांनी आपल्या सूचना सरकारला पाठवण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. लघु उद्योजकांची ताकद वाढली आहे. मंदी आहे पण रडत बसून फायदा नाही. विकासाचा दिवा पेटला पाहिजे. तुम्हाला पायावर उभं करु शकणारं सरकार असल्याचा विश्वास त्यांनी उद्योजकांना यावेळी दिला.