विशाल करोळे, झी मीडिया, ओरंगाबाद :  देशात आणि महाराष्ट्रात ओमायक्रोनने चिंता वाढवली आहे.  महाराष्ट्रात ओमायक्रोनचे २८ बाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झालं असून लसीकरणाचा वेगही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण लसीकरणाच्या या मोहिमेला राज्यात काही ठिकाणी हरताळ फासला जात आहे. औरंगाबादमध्ये लसीकरण प्रमाणपत्राचा चक्क गोरखधंदा सुरु आहे.


औरंगाबादमध्ये लसीकरणा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अनेक निमय लागू केले आहेत. लस नाही तर रेशन नाही, पेट्रोल नाही, दारू नाही अगदी दुकानातही प्रवेश नाही असे नियम लागू करण्यात आले. पण या नियमांना फायदा होण्याऐवजी गैरफायदा घेतला जात असल्याचं समोर आलं  आहे. लस न घेता लसीकरणाचं प्रमाणपत्र विकलं जात आहे. काही पैसे देऊन हे प्रमाणपत्र दिलं जात आहे.  


औरंगाबादच्या रोशनगेट भागात पल्स नावाच्या  एका छोट्या क्लीनिकमध्ये हा सगळा गोरखधंदा सुरु होता. अबु बकर आणि मोहम्मद मुदस्सीर हे दोन कर्मचारी लसीकरण केंद्राबाहेर लोकांना हेरायचे कुणाला लस घ्यायची नसल्यास, किंवा भीती वाटत असल्यास अशा लोकांना गाठून त्यांना पैशांच्या मोबदल्यात हे प्रमाणपत्र लस न घेता दिली जात होती.


ग्राहकांना गाठल्यावर त्यांना पल्स क्लीनीकला आणलं जायचं तेथून ग्राहकांचे डिटेल्स औरंगाबादच्या शीऊर आणि मनूर या ग्रामिण भागातील आरोग्य केंद्रावर पाठवले जायचे, तिथून ऑलनाईल माहिती भरली जायची ग्राहकाला आलेला ओटीपी तिकडे दिला की प्रमाण पत्र तयार होत होती.  गेली कित्येक दिवस हा धंदा जोमात सुरु होता.


धक्कादायक म्हणजे यात दोन सरकारी डॉक्टरांचाही सहभाग होता. काशी पैशांच्या मोबदल्यात या दोन सरकारी डॉक्टरांच्या मदतीने ४०० हून अधिक प्रमाणपत्र विकली गेल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमधील एक डॉक्टर आणि ग्रामिण भागातील आरोग्य केंद्रावरील एक इन्चार्ज डॉक्टर हे दोघे भाऊ हा सगळा प्रकार करायचे. पोलिसांनी तब्बल 8 दिवस पाळत ठेवीत या आरोपींना गजाआड केलं आहे..


दोन सरकारी डॉक्टरांबरोबरच खाजगी क्लीनीकमधील दोन तंत्रज्ञ आणि दोन नर्सचाही यात समावेश होता.  हे मोठं रँकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे, आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे.  ज्यांनी हे लसीकरण प्रमाणपत्र विकत घेतले त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.  


लसीकरण करणं हे कोविड पासून वाचण्यासाठीचं मोठं साधन आहे. मात्र त्याचाच असा गैरवापर सुरु राहिला तर खरंच कोरोना हद्दपार होईल का हा खरा प्रश्न आहे.