औरंगाबादच्या घनकचरा व्यवस्थापन विकास आराखड्याला मंजुरी
संपूर्ण निधी केंद्र आणि राज्य सरकार उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या 86 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये केली. यासाठीचा संपूर्ण निधी केंद्र आणि राज्य सरकार उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षानं उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यामध्ये औरंगाबाद महापालिकेच्या हिश्श्याचे 36 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेला कोणताही निधी द्यावा लागणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
संपूर्ण राज्यातल्या 152 शहरांचे 1 हजार 856 कोटी रुपयांचे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव मंजूर झाले असून, 31 मार्चपर्यंत आणखी 48 शहरांचे प्रस्ताव मंजूर होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.