मुलीच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी, जन्मदात्या आईलाच संपवलं
त्या एका फोनमुळे फसला मुलगी आणि प्रियकराचा डाव, अखेर पोलिसांना असा लावला छडा
मुंबई : प्रेम इतकं आंधळ आणि वेड करेल याची कल्पनाही करू शकणार नाही. प्रेमात अडसर ठरणाऱ्या जन्मदात्या आईलाच मुलीने संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे औरंगाबादमधील अंबिकानगर, मुकुंदवाडी परिसरात खळबळ उडाली.
मुलीच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी एवढी घट्ट होती की जन्मदात्या आईला संपवतोय याचं दु:खही तिला नसावं. तिने प्रियकराच्या मदतीने शेतात बोलवून आईला संपवण्याचा डाव रचला.
सुशीला संजय पवार असं मृत महिलेचं नाव आहे. त्यांच्या मागे दोन मुलं आणि एक मुलगी आहे. सुशीला या हातगाडीवर भाजी विकून उदरनिर्वाह करायच्या. रविवारी रात्री उशिरा त्यांना फोन आला. त्या फोननंतर त्या बाईकने शेतात गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुशीला यांचा पत्ताच नव्हता.
नातेवाईकांनी सुशीला घरी न आल्यानं शोधाशोध सुरू केली. त्यांचा मृतदेह बाळापूर शिवारात आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनंतर चौकशी झाली तेव्हा घरातील काही दागिने आणि पैसेही गायब असल्याचं समजलं.
पोलिसांनी मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स काढले त्यावेळी प्रकरणाचा खुलासा झाला. मृत सुशीला यांच्या फोनवर मुलीचा फोन होता. त्यांनी शेतात बोलवून घेतल्याचं समजलं.
मुलीने प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईवर धारदार शस्त्राने वार करून संपवलं. त्यानंतर मुलगी घरी गेली तर प्रियकर फरार झाला. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.