विशाल करोळे, झी 24 तास, औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये प्रचंड आर्थिक तंगी आली. खिशात पेट्रोलसाठी पैसैही नव्हते. त्यामुळे कामावर जायचं तरी कसं असा प्रश्न औरंगाबादमधल्या एका व्यक्तीला पडला. त्यावर त्यानं जबरदस्त तोडगा शोधून काढला आहे. त्याची आयडिया पाहून सारे जण अवाक झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावरून राजकुमारासारखी घोडेस्वारी करणारे हे आहेत शेख युसुफ. त्यांना असं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते औरंगाबादच्या एका कॉलेजमध्ये लॅब टेक्निशिअन आहेत. मिटमिटा भागात राहणा-या शेख युसूफ यांचं कॉलेज 20 किलोमीटर अंतरावर असल्यानं त्यांना दिवसाला एक लिटर पेट्रोल लागायचं. 



पेट्रोलचे दर दिवसागिक वाढत असल्यानं त्यांना प्रवासखर्च परवडत नव्हता. मग काय त्यांनी थेट बाईकच विकली आणि आलेल्या पैशात थोडे पैसे टाकून घोडाच विकत घेतला. आता कॉलेजच काय तर लग्नकार्य किंवा इतर कुठेही जायचं म्हंटलं की ते घोड्यावरूनच जातात.


बाईकऐवजी घोडेस्वारी केल्यानं लोकांनाही खूप अप्रूप वाटतं, शिवाय इंधनाचीही बचत होते असं युसुफ शेख सांगतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजनंही त्यांच्या घोड्याला पार्किंगमध्ये जागा दिली आहे. 


घोड्याचा दिवसाचा खर्च फक्त 50 रुपये आहे. शहराबाहेर राहत असल्यानं त्याला चरायला सोडलं की ते ही पैसैही वाचतात. महागाईनं खिशाला जाळ लागलेल्यांसाठी युसुफने ही नामी युक्ती शोधून काढली आहे.