विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या ११ मोठ्या अधिका-यांनी सफाई कर्मचारी भरतीत मोठा घोटाळा केलाय. राज्य सरकारनं नेमलेल्या चौकशी समितीत ही बाब समोर आली आहे. मोठी अनियमितता करून १८८ कर्मचा-यांची भरती या अधिका-यांनी संगनमतानं केली. याबाबत आता सगळ्यांच्याच चौकशीचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


१८८ सफाई कर्मचा-यांची भरती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद महापालिकेत २०१० ते २०१४ या काळात १८८ सफाई कर्मचा-यांची भरती करण्यात आली होती. महापालिकेच्या नियमानुसार सफाई कर्मचा-यानं २० वर्षाच्या सेवेनंतर निवृत्ती घेतली किंवा अपघात वा अन्य कारणानं २० वर्ष सेवेआधी जर तो सफाईचं काम करण्यास असमर्थ ठरत असेल तर त्याऐवजी पाल्याला नोकरी देण्याची तरतूद आहे. याच तरतुदीचा गैरफायदा मनपाच्या ११ वरिष्ठ अधिका-यांनी घेतला. 


भलत्याच लोकांना नोकरी


सफाई कर्मचा-यांचा पाल्याचा दावा नोकरीवर असतांना भलत्याच माणसाला नोकरी देण्यात आलीये आणि पाल्य असल्याचं खोटं शपथपत्र सुद्धा दाखवण्यात आलं. यात आर्थिक व्यवहार सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचं पुढं आलंय. ज्यावेळी खरे पाल्य नोकरीसाठी आले आणि त्यांना डावलण्यात आल्याचं पुढं आलं त्यावेळी हा सगळा घोटाळा उघड झाला. स्थानिक पातळीवर तर या अधिका-यांना आधीच क्लीन चिट देण्यात आली होती मात्र हा मुद्दा विधानसभेत आला आणि तुकाराम मुंडे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर हा सगळा घोटाळा पुढं आला. आताही कारवाई लवकरच होईल असं अधिकारी सांगतायत मात्र नक्की कधी याचं उत्तर देण्यास टाळाटाळ सुरुच आहे.


११ मोठे अधिकारी


या घोटाळ्यात ३ उपायुक्त दर्जाचे अधिकारी, ३ मुख्यलेखापरीक्षक, ४ आस्थापना अधिकारी आणि १ विधी सल्लागार यांचा समावेश आहे. म्हणजे या अधिका-यांनी बराच अभ्यास करून संगनमतानं हा घोटाळा केल्याचं दिसतंय. या अकराही अधिका-यांविरुद्ध  नागरी सेवा शिस्त नियम १९७९ मधील तरतुदीनुसार कारवाईचे आदेश दिलेत.मात्र कारवाई होईल का हाच खरा प्रश्न आहे. महापौर मात्र शासनाच्या आदेशानुसार कारवाई होईल असं सांगतायत.


सफाई कर्मचा-यांच्या या भरतीत अधिका-यांनीच मोठ्या सफाईनं घोटाळा केला. मात्र आता हा घोटाळा उघड झालाय. या घोटाळ्यातील दोषी शोधायला तब्बल ४ वर्षांपेक्षा जास्त काळ गेलाय. आता किमान दोषींवर तातडीनं कारवाई करावी जेणेकरून भविष्यात तरी अशा घोटाळेबाज अधिका-यांना चाप बसेल.