औरंगाबाद : औरंगाबादजवळच्या मिटमिटा गावात पोलिसांनी केलेल्या दगडफेकीप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलीय. 


काय घडलं होतं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये आठ तारखेला मिटमिटा गावात पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात गावकऱ्यांनी पोलीसांवर दगडफेक केली. 


त्याला प्रत्तुतर देण्यासाठी पोलिसांनीही काही घरांवर दगडफेक केली. पोलिसांनी केलेल्या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांनी सार्वजनिक करून घटनेचं वास्तव जगासमोर आणलं. 


या घटनेचे आज विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. पोलीस आयुक्तांवर कठोर कारवाईची मागणी करत विरोधक आणि शिवसेना आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. 


सकाळपासून पाच वेळा विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन करून यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा केली. 


यशस्वी यादव यांच्या कारकिर्दीवर एक नजर... 


- यशस्वी यादव हे २००० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत


- जळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक


- त्यानंतर नागपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती


- कोल्हापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक


- २००९ ते २०११ मध्ये कोल्हापूर पोलीस अधीक्षक असताना महिला पोलीस लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे उचलबांगडी


- २०११ ते २०१६ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर त्यांना धाडण्यात आलं होतं. 


- २०१६ ते २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमधून आल्यानंतर ठाण्यात प्रशासकीय पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती 


- एप्रिल २०१७ पासून औरंगाबादमध्ये पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती