विजयी रॅलीत उत्साही एमआयएम कार्यकर्त्यांकडून पाण्याची नासाडी
इम्जियाज जलील यांच्या विजयी रँलीमध्ये 8 टँकर पाण्याची नासाडी झाली.
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : गेली काही दिवस औरंगाबादचे एमआयएम खासदार सातत्याने लोकसभेत राजकीय भाषणांत औरंगाबादचा पाणी प्रश्न मांडत आहे. मात्र त्यांच्याच विजयी रँलीत उत्साही एमआयएम कार्यकर्त्यांनी मजा म्हणून पाण्याचे टँकर कार्यकर्त्यांच्या अंगावर रिते केले. मराठवाडा एकीकडे पाण्याच्या थेंब अन् थेंबासाठी तड़फडत असताना एमआयएमची असली पाण्याची उधळपट्टी टिकेची धनी ठरतेय. इम्जियाज जलील यांच्या विजयी रँलीमध्ये 8 टँकर पाण्याची नासाडी झाली.
या रँलीमध्ये कार्यकर्त्यांच्या अंगावर पाणी उडवून मजा मस्ती कऱण्यात आली. पाण्याचे 7 ते 8 टँकर रँलीत कार्यकर्त्यांच्या अंगावर रिते कऱण्यात आले. कार्यकर्ते नाचत होते पाणी उधळणं सुरु होतं. खासदार साहेब लोकांकडून सत्कार करून घेण्यात व्यस्त होते. धक्कादायक म्हणजे या रँली आधी एका जाहीर कार्यक्रमात बोलतांना जलील यांनी औरंगाबादचा पाणीप्रश्न पोटतिडकीनं मांडला होता. आणि त्याच्या तासाभरातच त्यांच्या रँलीच पाणी उधळण्याचं हे चित्र दिसंलं. एकाच दिवशी एमआयएमच्या पाणी प्रश्न मांडण्याचा आणि पाणी उधळण्याचा या दोन बाबी समोर आल्या आहेत.
रँली काढून जलील यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं आणि त्यात पाण्याची वारेमाप उधळपट्टी करून पाण्याच्या प्रश्नावर किती ते गंभीर आहेत याचंही चित्र समोर आलं. दुष्काळी मराठवाड्यात पाण्याची ही उधळपट्टी निश्चितच शोभणीय नाही. मात्र पाणी उधळताना याचं कुठंलही सोयरसुतक एमआयएमच्या कार्यकर्त्यांना दिसलं नाही. या सगळ्यावर शिवसेनेनंही सडकून टीका केली आहे, एमआयएमचं खरं रुप समोर आलं आणि लोकांना ते दिसतंय या शब्दात शिवसेनेनं टिका केलीये.
पाण्याची अशा पद्धतीनं नासाडी निश्चितच दुर्दैवी आहे. शहराला सध्या पाच दिवसाआंड पाणी पुरवठा होतोय. एक एक टँकरसाठी नागरिकांना वाट पहावी लागतेय, त्यात पाण्याचा असा वापर निंदनीयच म्हणावं लागेल. आता या उत्साही कार्यकर्त्यांच्या या भूमिकेवर एमआय़एम काय भुमिका घेतं हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठवाड्यात मोठा दुष्काळ आहे. जायकवाडी तळाला गेली आहे. त्यात पाणी उधळून असा उन्माद दाखवणं निश्चितच योग्य नाहीये. या सर्वात एमआयएमचा खरा चेहरा समोर आला आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरै यांनी दिली आहे.