`अडचणीत असाल तर मोफत न्या`, भाजीवाल्याचं मनं मोठं !
`जे विकत घेऊ शकतील त्यांनी विकत घ्या, जे अडचणीत असतील त्यांनी मोफत न्या`
औरंगाबाद : देशातील कोरोनाचे संकट संपण्याचे नाव घेत नाही पण कानाकोपऱ्यात माणुसकीचे दर्शन घडवणारी अनेक उदाहरण समोर येत आहे. औरंगाबाद येथील तरुण भाजीविक्रेत्याने लावलेली पाटी आज राज्यभरात चर्चेत आहे. 'जे विकत घेऊ शकतील त्यांनी विकत घ्या, जे अडचणीत असतील त्यांनी मोफत न्या' अशी पाटी त्याने आपल्या भाजीच्या स्टॉलवर लावली आहे.
राहुल लबाडे असे या तरुणाचे नाव असून तो पदवीधर आहे. औरंगाबादच्या भावसिंहपूरा येथील आंबेडकर चौकात तो भाजी विकतो.
खासगी कंपनीत कामाला असलेल्या राहुलला लॉकडाऊनमध्ये पगार मिळत नसल्याने नोकरी सोडावी लागली. उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने भाजी विकायला सुरुवात केली. हे करत असताना गरीबांकडे भाजी खरेदीला पैसे नसल्याचे त्याच्या लक्षात आले.
एका प्रसगांने त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. एक वृद्ध महिला ५ रुपये घेऊन माझ्याकडे आली आणि तिने भाजी मागितली. तिला गरजेची होती तितकी भाजी मी त्यावेळी दिली. त्यानंतर अशा गरजुंना मोफत भाजी देण्याचा निर्णय मी घेतल्याचे राहुल याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
गेल्या तीन महिन्यात शंभरहून अधिक गरजवंताना त्याने मदत केली आहे. २ हजारापर्यंतची भाजी मी मोफत देतो. जोपर्यंत मला आर्थिकदृष्ट्या हे शक्य आहे तोपर्यंत मी हे करत राहीन. कोणी उपाशी झोपलं नाही पाहीजे ही माझी इच्छा असल्याचे राहुल म्हणतो.