विहिरीतील पाणी उपसण्यासाठी औरंगाबादमधील तरुणाकडून नव्या यंत्राचा शोध
चौकोनी डब्यासारख दिसणारे हे यंत्र विहिरीतून हमखास पाणी उपसतं
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : दुष्काळाच्या तडाख्यात ग्रामीण भागात विहीरीसुद्धा आटल्या आहेत, हंडाभर पाणी काढण्यासाठी जिव मुठीत घेऊन विहीरीत उतरावे लागत आहे. विहीरीतील खोलवर पाणी हाताने काढणे शक्य नाही, विज गेल्यावर पंपही चालत नाही, पाणी उपसणे जिकरींच आणि त्रासाचे काम झाले आहे, मात्र आता याही समस्येवर तोडगा निघाला आहे. औरंगाबादमध्ये इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांनी यावर तोडगा काढला आहे. या तोडग्याचं नाव आहे दत्तधनुष...दत्तधनुष बॅटरीवर चालंणारे हे छोटं यंत्र आहे, दिसायला अगदी छोटेखानी चौकोनी डब्यासारखे दिसणारे हे यंत्र विहिरीतून हमखास पाणी उपसतं, ते सुद्धा मिनिटाला 3 लिटरवर.
या यंत्राला दोन पाईप आहे, एक विहिरीतून पाणी ओढायला आणि दुसरा पाणी बाहेर सोडायला. हे यंत्र दोरीला बांधून पाण्यात सोडायचे, पाण्याच्या जवळ अथवा 6 फुटांवर हे यंत्र धरता येते, पाण्यात पाईप सोडला की मशीन पाणी उपसते आणि अगदी 800 फुटांपर्यंत हे पाणी हे मशीन उपसते. त्यामुळे आता वीज असो वा नसो, पाणी कितीही असो हे यंत्र पाणी उपसणार आणि तहान भागवणार. फक्त पाणीच नाही, तर पंपाला एक छोटा नॉब बसवला की हे यंत्र फवारणी यंत्रासारखं काम करु शकते. अगदी झाडाला पाणी देणे इतकंच नाही तर एका पिंपात फवारणी रसायन तयार केलं आणि त्याला यंत्र लावलं तर हजार फुटांपर्यंत फवारणी सुद्धा तुम्ही करू शकता.
अगदी जनावरांची आंघोळसुद्धा या यंत्राच्या माध्यातून करता येते, 4 तासांचं पुर्ण चार्ज होणारे हे यंत्र नंतर सहज तीन तासावर चालते. विहिरीतून पाणी काढतांना ग्रामीण भागात लोकांचे हाल, फवारणी करतांना अंगावर टाकी बांधून करावा लागणारा द्रविडी प्राणायाम, या सगळ्यांपासून शेतक-यांची कशी मदत करता येईल याचा विचार सुरु असतांना कुठेतरी काहीतरी पाहिले आणि त्यातून हा दत्तधनुष्य निर्माण झाल्याचं संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. अंकूर आणि त्याच्या चार अभियंता मित्रांनी हा अविष्कार घडवला आहे. तब्बल दीड वर्षाहून अधिक वेळ त्यांनी यासाठी दिला. सुरुवातीला काही खर्च सुद्धा वाया गेला, मात्र त्यानंतर आता 3500 रुपयांच्या खर्चात हे यंत्र आता या विद्यार्थ्यांनी साकारलं आहे, बाजारात विक्रीला 4500 रुपयांवर हे यंत्र विकण्याचा विचार या विद्यार्थ्यांचा सुरु आहे. सध्या पाण्यावर धरावं लागणारं हे यंत्र आणि विकसित करून पाण्यावर तरंगणारं यंत्र बनविण्याचा प्रयत्नही या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे, त्यामुळे त्रास कमी होईल. या यंत्राचा खर्च अगदी कमी आहे, या विद्यार्थ्यांनी यांच्या पेटंटसाठीदेखील अर्ज केला आहे. स्टार्टअप इंडियाच्या माध्यातून एक नवा व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करत आहेत.