मुंबई: भाडेवाढ आणि ओला, उबेरच्या वाहतुकीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील रिक्षाचालकांनी पुकारलेला नियोजित संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्र्यांनी भेटीचे आश्वासन दिल्यामुळे आपण हा संप मागे घेत असल्याची घोषणा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली. या भेटीत आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आम्हाला आहे. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही संप मागे घेत असल्याचेही शशांक राव यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी सोमवारी दुपारी परिवहन सचिवांनी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात रिक्षा चालक - मालक संघटनांची बैठक बोलवली होती. रिक्षा चालक संघटनेचे नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक संघटनांचे शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे रिक्षा चालक मालक संपावर ठाम होते. 


भाडेवाढ, ओला, उबेरसह अवैध वाहतुकीवर बंदी आणि  रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. जवळपास २० लाख रिक्षाचालक या संपात सहभागी होण्याची शक्यता होती.