मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित केलं त्याला गुरुवारी २३ एप्रिल रोजी एक महिना पूर्ण झाला. आधी २१ दिवसांसाठी घोषित केलेला लॉकडाऊन नंतर ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात देशभरात २१ हजारावर रुग्ण वाढले असून कोरोनामुळे दररोज सरासरी २० बळी गेले आहेत. विशेष म्हणजे मुंबईतही रुग्णांची संख्या महिनाभरात १०० पटींनी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात लॉकडाऊनची घोषणा करत होते तेव्हा देशभरात कोरोनाचे ४६७ रुग्ण होते. त्या दिवसापर्यंत भारतातील कोरोना बळींची संख्या होती ९. महिनाभरानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या २१७०० पर्यंत पोहचली आहे. म्हणजे महिनाभरात २१ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली असून गुरुवारी एका दिवसात ७७८ रुग्ण वाढले आहेत. महिनाभराची सरासरी आकडेवारी पाहिली तरी देशात दररोज जवळपास ७०० रुग्णांची भर पडत आहे. २३ मार्चला देशभरात ९ बळी गेले होते, तर आता महिनाभरानंतर देशभरात ६८६ बळी गेले आहेत. महिनाभरातील कोरोना बळींची संख्या पाहता दररोज सरासरी २० बळी गेले आहेत.


महिनाभरापूर्वी म्हणजे २३ मार्चला महाराष्ट्रात कोरोनाचे ९७ रुग्ण होते. तर तिघांचा मृत्यू झाला होता. महिनाभरानंतर २३ एप्रिलला महाराष्ट्रात ६४२७ रुग्ण आहेत आणि राज्यात २८३ बळी गेले आहेत. २३ मार्चला महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ रुग्ण वाढले होते. महिनाभरानंतर म्हणजे २३ एप्रिलला एका दिवसात तब्बल ७७८ रुग्ण वाढले आहेत. महिनाभरात कोरोनाचा फैलाव किती वेगाने झाला आहे, याचा अंदाज या आकडेवारीवरून येऊ शकतो. महिनाभरापूर्वी राज्यात कोरोनाचे ३ बळी गेले होते. ही संख्या महिनाभरानंतर २८३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १४ बळी गेले आहेत. त्यात मुंबईत ६ आणि पुण्यात ४ बळी गेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात २८० बळी गेले असून ही आकडेवारी पाहता राज्यात रोज सरासरी ९ बळी गेले आहेत.


महिनाभरापूर्वी राज्यातील ९७ रुग्णांपैकी मुंबईत ४१ रुग्ण होते, तर पुण्यात १६ रुग्ण होते. महिनाभरानंतर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार २०५ वर पोचली आहे. म्हणजे मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या महिनाभरात १०० पटींनी वाढली आहे. तर मुंबईत महिनाभरापूर्वी ३ बळी गेले होते. महिनाभरानंतर मुंबईतील कोरोना बळींची संख्या १६७ झाली आहे. तर पुण्यात महिनाभरापूर्वी १६ असलेली रुग्णसंख्या आता ८१२ वर पोहचली आहे.


महिनाभरापूर्वी पुण्यातील पहिल्या कोरोना रुग्णाची टेस्ट उपचारानंतर निगेटिव्ह आली होती. त्यामुळे राज्यातला पहिला रुग्ण बरा झाल्याची बातमी २३ मार्चला आली होती. तर महिनाभरानंतर राज्यात ८४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


 



लॉकडाऊनच्या काळातही देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचं या आकडेवारीतून दिसून येत आहे.