यवतमाळ : राळेगाव जंगलातील नरभक्षक अवनी अर्थात टी वन वाघिणीच्या मादा बछड्याला अखेर जेरबंद करण्यात आलं. वाघिणीला सीवन आणि सीटू हे दोन बछडे असून सी टू या मादा बछड्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कक्ष क्रमांक ६५५ मध्ये ही मोहीम यशस्वी झाली असून आता सीवन या नर बछड्याला पकडण्याच्या मोहीमेला गती देण्यात आली आहे. १३ ग्रामस्थांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक टी वन वाघिणीला वनविभागाच्या कारवाईत २ नोव्हेंबरच्या रात्री ठार मारल्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षकाच्या आदेशानुसार तिच्या दोन्ही बछड्यांना बेशुद्ध करून पकडण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली होती. 


दीड महिन्यापासून हे बछडे ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले जात होते. आणि वनविभागाने ठेवलेल्या सावजाची शिकार करीत असले तरी वनविभागाला मात्र ते हुलकावणी देत होते. अंजी धरण परिसरात या बछड्यांच्या वावर असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर वनविभागानं तब्बल ८० हेक्टर जंगल परिसराला १० फूट उंच जाळीचे कुंपण ठोकून त्यावर कापड बांधले होते. 


शिवाय मध्यप्रदेशातून चार हत्ती पाचारण केले. ६ पशुवैद्यकीय अधिकारी ४ हत्तीसह जंगलात त्यांचा शोध घेत होते. अखेरीस सी २ या मादा बछड्याला ट्रान्क्युलाईज गणमधून डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. या बछड्याला लागलीच पेंच अभयारण्यात रवाना करण्यात आले आहे.