काम नसताना घराबाहेर जाणं टाळा, कोल्हापूरकरांना प्रशासनाचा अलर्ट
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून नागरिकांना अलर्ट करण्यात आलं आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना अलर्ट केलंय.
काम नसताना घरा बाहेर पडणे टाळा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.नदी, ओढा आणि धबधब्याचे पाणी पाहायला नागरिकांनी जावू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केलंय.
NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत या टीम कोल्हापुरात दाखल होणार आहेत. सोमवार सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीये. राजाराम बंधारा आणि शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेलाय. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
हवामान खात्याने पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.