पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षातून ढकललं आणि बाळ चोरलं
पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये राहणाऱ्या रेश्मा शेख या महिलेचं बाळ चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये राहणाऱ्या रेश्मा शेख या महिलेचं बाळ चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.
रेश्मा शेख सकाळी दहाच्या सुमाराला खडकीमधल्या शेवाळे रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. परतत असताना तिने रुग्णालयापासून रिक्षा केली. त्याच वेळी हॅरीस ब्रिजजवळ रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. रिक्षात बसलेल्या दुसऱ्या महिलेने तिला रिक्षातून ढकलून दिलं आणि रेश्माच्या दहा दिवसांच्या बाळाला घेऊन ते दोघे पसार झाले.
खडकी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. रेश्मा शेख ज्या ठिकाणाहून रिक्षात बसली त्या शेवाळे रुग्णालयात सीसीटीव्ही नाही. जिथे तिला रिक्षातून ढकलून देण्यात आलं तिथंही सीसीटीव्ही नाही. आता पोलीस शेवाळे रुग्णालय ते हॅरीस ब्रिजदरम्यान ही रिक्षा सीसीटीव्हीत दिसली का याचा शोध घेत आहेत.