Bacchu Kadu Speech : अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणांनी आज निवडणुकीसाठीचा अर्ज भरला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यापूर्वी नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला. हायकोर्टाने नवीन राणांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. त्यावर आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. "सध्या सर्वत्र तानाशाही सुरु आहे. न्यायालयावरचा सर्वसामान्य माणसाचा विश्वास पायदळी तुडवला जात असेल, तर सगळं संपलं आहे", असे म्हणत बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"हा निकाल दिल्यानंतर न्यायप्रिय लोक विचार करतील, 108 पानाचा निर्णय हायकोर्टने दिल्यानंतर आता या कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यात आधीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागायच्या आधीच निकाल लागल्याचे सांगितलं. त्यामुळे आता अतिरेक सुरु आहे. हायकोर्टाचा निकाल लागायच्या आधीच बावनकुळे म्हणतात की निकाल लागला आहे. त्यामुळे एवढी तानाशाही चालू आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे न्यायालयावरचा आमचा सामान्य माणसाचा विश्वास पायदळी तुडवला जात असेल, तर सर्व संपलं आहे", असे बच्चू कडू म्हणाले. 


"एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात सापडणार नाही"


यापुढे ते म्हणाले, "नवनीत राणा यांनी आज डोळ्यातून अश्रू काढले आणि म्हटलं होतं की टीका करणाऱ्यांना आजच कोर्टाच्या निकालातून उत्तर मिळालं. त्यावर बच्चू कडू म्हणाले की जनतेचे उत्तर काही वेगळं आहे. रडणं म्हणजे सहानुभूती घेणं, असं नाही. तीच सहानुभूती आता संपली आहे. निवडणुकीत रडणं आता चांगलं नाही. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडला असता तर आम्हाला कीव आली असती, पण तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत आहात, हे दुर्दैवी गोष्ट आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या आधी त्यांचा निकाल येतो. एवढ्या वेळी कोर्ट कस काय चालते? त्यामुळे धर्म, जात सोडून ज्या लोकांना लोकशाही टिकावी असं वाटत असेल तर त्यांनी याचा विरोध केला पाहिजे", असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. 


"रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी माफी मागितली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला मोठा भाऊ म्हटले होते आणि आज त्याच भावाला तुम्ही आता पैसे खाता असे म्हणता. सरडा तरी दोन दिवसांनी रंग बदलतो. त्यामुळे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की राणा जर आमच्यासोबत असं वागत असेल तर सामान्य लोकांसोबत कसं वागत असेल? आता आमच्यावर टीका करतो, एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात सापडणार नाही. सेटलमेंट तर तू जर दहा ठिकाणी केली आहे. भाजप, राष्ट्रवादीसोबत आपल्या पदासाठी सेटलमेंट केली आहे. काय धंदे आहे ते काढायला लावू नका. काढायला लागले तर वांदे होईल", असा इशाराही बच्चू कडूंनी नवनीत राणांना दिला. 


नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर असतील


"राणा हे हरलेल्या मानसिकेतून बोलत आहे. त्यांची हार निश्चित आहे. त्यांच्या जातीतील अर्धे मतं आम्हाला भेटणार आहे. राणा हे तिसऱ्या नंबरवरही राहणार नाही. नवनीत राणा या चौथ्या क्रमांकावर असतील  हे मी तुम्हाला 100 टक्के सांगतो. मला पण धमकीची चिठ्ठी आली होती. सध्या लोकांचा यंत्रणेवरचा विश्वास उडत चालला आहे", असेही बच्चू कडू म्हणाले.


"बच्चू कडू यांनी उमेदवार दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू ही काँग्रेसची बी टीम आहे असं वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. आता त्यावर बच्चू कडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांना असा बोलण्याचा अधिकार नाही, आमची बी टीम आहे की सी आहे ते त्यांनी बघावं. पत्नी भाजपमध्ये आणि रवी राणा स्वाभिमानमध्ये त्यांना ते बोलण्याचा अधिकार नाही. रवी राणा यांनी स्वाभिमान विकलेला आहे. स्वाभिमान पक्षाचे नाव ठेवलं पण त्याचा अभिमान कोणाला राहिला नाही", असे बच्चू कडू यांनी म्हटले.