जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोल्यामध्ये पहिल्यांदाच बियाणे महोत्सव भरलं आहे. 'शेतकऱ्यांचं बियाणं शेतकऱ्यांसाठी' अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यमंत्री बच्चू कडू यांची ही संकल्पना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी संकल्पना काय?
1 जून ते 6 जूनपर्यंत म्हणजेच 6 दिवसांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बियाणं महोत्सवात जिल्ह्यातील 826 शेतकरी सहभागी झाले आहेत.


शेतकऱ्यांचं बियाणं शेतकऱ्यांसाठी संकल्पना कशासाठी?


खाजगी कंपन्यांनी बियाण्यांच्या विक्री दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसताना दिसतेय. एकीकडे शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड झालेली असताना दुसरीकडे बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरु आहे. हंगाम वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी ही संकल्पना राबण्याचा विचार. 


बियाणं महोत्सवामुळे शेतकऱ्यांचा फायदा कसा?


शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकरी, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण बोगस बियाणांच्या विक्रीवर चाप बसवण्यासाठी बच्चू कडू यांनी हा संकल्पनेला सुरुवात केली. या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडूनच शुध्द व उत्कृष्ट दर्जाचे बियाणे अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. 


शेतकऱ्यांकडून बियाणं महोत्सावाला उत्तम प्रतिसाद - 


शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पहिल्याच दिवशी महोत्सावाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे 3500 ते 4000 क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे.त्यासोबतच 22 शेतकरी कंपनी सहभागी झाल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत महोत्सावाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. 


किती शेतकऱ्यांचा महोत्सवात सहभाग?


बार्शी टाकळीमध्ये 150, मुर्तिजापूरमध्ये 92, पातुरमध्ये 76, बाळापूरमध्ये 120, तेल्हारातून 150, अकोटमधून 125 असे एकूण 826 शेतकरी महोत्सवात सहभागी. तर एकूण 22 शेतकरी कंपन्यांची नोंदणी. सर्व शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी 284 स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या महोत्सवात सोयाबीन, तुर, उडीद, मूग,कांदा, भाजीपाला पिकं, बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.


जाणून घ्या विक्री प्रक्रिया कशी असणार?


या महोत्सवात बियाणे प्रक्रिया करणे, त्यात रासायनिक व जैविक प्रक्रिया करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिकेही दिली जात आहेत. विक्रीसाठी बियाणे उगवण्यासाठी क्षमता तपासूनच विक्रीसाठी आणण्यात आले आहे.


बियाणं खराब निघाल्यास जायचं कुठे?


कंपनीकडून खरेदी केलेल्या बियाण्यांची तक्रार कृषी विभागात करता येते पण शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या बियाण्याचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला. मात्र अकोल्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याची जबाबदारी स्विकारली आहे. बियाण्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आपण आहोत, असं आश्वासन बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना दिलंय.