`भाजपा, शिवसेना कोणातही धमक नाही`, बच्चू कडू विधानसभेत स्पष्टच बोलले, `...मग राष्ट्रगीतामधून `मराठा` शब्द काढा`
मराठा आरक्षणावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा एका जातीचा असेल तर जन-गण-मन मधून तो शब्द काढून टाका असं ते म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा एका जातीचा असेल तर जन-गण-मन मधून तो शब्द काढून टाका असं ते विधानसभेत म्हणाले आहेत. राज्यात आजवर 8 वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता मराठ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्ष मराठा मुख्यमंत्री बनवा अशी हास्यास्पद मागणी करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.
"मी कधीच जातीपातीत पडलो नाही. जातीपेक्षा, धर्मापेक्षा हक्काची लढाई मोठी असते. एका शेतकऱ्याचे प्रश्न मिटले तर सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतील. पण भाजपा, काँग्रेस, शिवसेना कोणातही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक नाही. 75 वर्षात तुम्ही शेतकऱ्याचं भलं करु शकत नाही हे दाखवून दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी आमदार, खासदार उभे राहत नाहीत," अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
"आपण जाती-धर्मात पडावं की नाही असा विचार येतो. पण जन्म झाल्यानतर माणसाला जात, धर्म चिकटतो. जात जन्मापासून मरणापर्यंत लागते. तसं ते विषच आहे," असं बच्चू कडू म्हणाले. हे सभागृह ज्या मजुरांनी बांधलं त्यांना 100 रुपये मजुरी होती. इंजिनिअरला 800 रुपये मिळायचे. हे लुटीचं तंत्र आहे. जो जास्त कष्ट करतो त्याला लुटलं जातं. श्रीमंताने अधिक श्रीमंत व्हावं गरीबाने गरीब राहावं आणि श्रीमंतांची भांडी घासावी अशी टीका त्यांनी केली.
"बाबासाहेबांनी कधी शरीरात जात घुसू दिली नाही. होय मी पहिले भारतीय आणि नंतरही भारतीय असं त्यांनी म्हटलं होतं. आम्ही महापुरुष्चाया नावावर जात लावतो इतके नालायक आहोत. अशांना पेटवून दिलं पाहिजे. आपण पुतळ्यालाही जात लावतो," अशीही खंत त्यांनी मांडली.
"एका सभेत 160 आमदारांना आम्ही पाळू असं नेता म्हणाला. मोठे नेते अशाप्रकारे बोलले तर सामान्य कार्यकर्त्यासमोर काय उदाहरण ठेवत आहोत. महाराष्ट्रात अशाने आग लागेल. विष पाजून नको तर अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा. घरं जाळली याचा निषेध केलाच पाहिजे. पण 50 मराठ्यांच्या मुलांनी आत्महत्या केली. मी एका मुलाच्या घरी गेलो तर डोळ्यात फक्त पाणी होतं. घरं जाळली हे ठासून सांगतात, पण 50 आत्हमत्या झाल्याचा उल्लेख होत नाही. एवढे जातीवाद सभागृहात असतील तर पावित्र्य कसं राखलं जाईल," असं बच्चू कडू म्हणाले.
"उपोषणावर लाठीतार्ज झाल्याचं कधी पाहिलेलं नाही. मी जरी सरकारमध्ये असलो तरी सत्य महत्त्वाचं आहे. ही वाईट गोष्ट नाही का? तुमचा बाजूला गृहमंत्री बसतो आणि सवाल विचारता आमदारांची घरं कोणी जाळली? तुमच्या बाजूला वित्तमंत्री तुम्ही विचारता ओबीसी निधी का नाही? तुम्ही कॅबिनेटमध्ये बसता मग थेट तिथे विचारा," अशी टीका बच्चू कडू यांनी अप्रत्यक्षणे छगन भुजबळांवर केली.
"मराठा हा एका जातीचा शब्द नाही. मराठा एका जातीचा असेल तर जन-गण-मन मधून काढून टाका, एका जातीचा उल्लेख का केला जातो? तसा प्रस्ताव तयार करा. 800 वर्षांपूर्वीचा पुरावा आहे. चारित्र्यग्रंथातही याचा उल्लेख आहे. कुणबी, पाटील हा मराठाच आहे. पाटील, देशमुख ही पदवी आहे. मराठा हे या मुलखाचं नाव आहे," असं बच्चू कडू म्हणाले.