अपघातग्रस्तांच्या मदतीला बच्चू कडू; ताफा थांबवून स्वत:च्या गाडीतून जखमींना रुग्णालयात नेलं
रुग्णसेवक म्हणूनही बच्चू कडू यांची ओळख आहे.
अमरावती : सातत्याने आगळ्या वेगळ्या आंदोलनातून चर्चेत राहणारे बच्चू कडू यांची ओळख रुग्णसेवक म्हणूनही आहे. अपघातग्रस्त लोकांच्या मदतीला राज्यमंत्री बच्चू कडू धावून गेले. एवढेच नाही तर स्वताच्या गाडीत त्या अपघात ग्रस्तांना आणून रुग्णालयात दाखलही केले. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ते अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकीच्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष जबर जखमी झाले.
याच दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू हे कामानिमित्त अकोला येथे जात असताना त्यांना हा अपघात झाल्याचं दिसलं. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.
राज्यमंत्री बच्चू कडू हे एवढ्यावर थांबले नाही, तर त्यांनी स्वतःच्या वाहनात त्या अपघातग्रस्तांना आणून दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर बच्चू कडू हे पून्हा अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.
आपल्या मंत्री पदाचा कुठलाही बडेजाव न ठेवता रस्त्यांवर झालेल्या अपघातील, जखमींच्या मदतीला धावणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील रुग्ण सेवेची तळमळ पुन्हा एकदा उपस्थितांना अनुभवायला मिळाली.