Amravati Jilha Madhyavarti Sahakari Bank Election :  माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांना जोरदार धक्का दिला. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडूंनी बाजी मारलीय. काँग्रेसकडे संख्याबळ असतानाही बच्चू कडू यांनी बँकेचं अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणलं. त्यामुळे यशोमती ठाकूरांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाडी समजल्या जाणारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेसचे संख्या बळ जास्त आहे. असे असताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी खेळी खेळत काँग्रेसची तीन मते आपल्याकडे वळवत अध्यक्षपद खेचून आणले आहे. बच्चू कडू यांच्या खेळीमुळे यशोमती ठाकूर यांना जोरदार धक्का बसल्याचे पाहायला मिळाले आहे. 


बच्चू कडू यांची यशस्वी खेळी!


अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  निवडणुकीत बच्चू कडू यांच्या गटातर्फे बच्चू कडू स्वतः अध्यक्षपदासाठी तर सहकारातील नेते अभिजीत ढेपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते. बच्चू कडू आणि अभिजीत ढेपे या दोघांनाही 11-11 मते मिळाली तर काँग्रेसचे यशोमती ठाकुर व बबलू देशमुख गटाचे उमेदवार माजी आ. वीरेंद्र जगताप व हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही दहा दहा मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची या निवडणुकीत तीन मते फुटून ती बच्चू कडू यांच्या कडे वळवली गेली त्यामुळे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या गटाला हा जबर धक्का असल्याचे बोलल्या जात आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एक हाती सत्ता होती. शेतकऱ्यांना व संचालकांना त्रास देणाऱ्या हुकूम शहांची हुकूमशाही संपवली व जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.


बच्चू कडू NDA मध्ये सहभागी होणार?


प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू दिल्लीत आयोजीत करण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी झाले होते.  राज्यातल्या विविध छोट्या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न भाजप करतेय. त्याच दृष्टीने बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला निमंत्रण देण्यात आले होते शिंदे-फडणवीस सरकारला बच्चू कडूंनी पाठिंबा दिला. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे अनेकदा नाराजी बोलून दाखवली. तेव्हा या नाराजीनंतरही बच्चू कडू एनडीएत सहभागी होणार का? अशी चर्चा रंगली होती. आमंत्रित केलं म्हणून गेलो, मी NDA मध्ये सामील व्हावं किंवा नाही हे कार्यकर्त्यांना विचारून ठरवेल. आतापर्यंत मी कोणाला समर्थन दिलं नाही. मी कोणाच्या समर्थन घेतलं नाही. मोठा निर्णय आहे तो कार्यकर्त्यांशी विचारू घेऊ असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.