कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेल्या रस्त्याची तीन महिन्यात दूरवस्था, ग्रामस्थ आक्रमक
अवघ्या तीन महिन्यातच रस्त्याची चाळण
मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबादहुन जुनोनी, आंबेहोळ, वळगुडकडे जाणारा 10 किमी अंतराचा तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या तीन महिन्यात उखडला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून हा रोड बनवण्यात आला होता. मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ता तयार करण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. रस्त्यावर डांबर टाकला की नाही, असा प्रश्न पडतो. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार जुनोनी, आंबेहोळ, वळगुड, जाधववाडीच्या ग्रामस्थांनी केली होती. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत कंत्राटदारांना पाठीशी घातले असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. सध्या ग्रामस्थांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने खड्ड्यांवर पॅचवर्क करण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र पावसाळ्यात हे पॅचवर्क टिकतील का? हा प्रश्न आहे.
त्यामुळे ग्रामस्थांनी पॅचवर्कचं काम होऊ द्यायचं नाही, असा पवित्रा घेतल्याने कंत्राटदाराला हे काम बंद करावं लागलं आहे. गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.