CM Eknath Shinde :  बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याच्याराच्या (Badlapur Case) घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या घटनेवर लोकांचा उद्रेक पाहायला मिळतोय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणाविरुद्ध महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर विरोधकांकडून जाणूनबुजून राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. बदलापूर प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एका खटल्याचा संदर्भ देत आरोपीला घटनेच्या दोन-तीन महिन्यात फाशीची शिक्षा सुनावल्याचं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांडून सत्ताधाऱ्यांना सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फाशीसंदर्भात केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आक्रमक झालेत. फाशीच्या घटनेसंदर्भात SIT स्थापन करून चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलीय. बलात्काराच्या आरोपीला अवघ्या दोन महिन्यात फासावर लटकावल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रत्नागिरीच्या भर सभेत केला. यावर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत. कोणत्या आरोपीला फासावर लटकावलं, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी, अशी मागणी संजय राऊतांनी केलीय. महाराष्ट्रापासून काय लपवताय का? असा सवालही त्यांनी केलाय.


मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर 
फाशीवरून विरोधकांनी हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनीही पलटवार केला. मावळमधील बलात्काराच्या घटनेत तेजस दळवी नावाच्या आरोपीला फाशी झाल्याचा दाखलाच त्यांनी कोल्हापूरच्या सभेत दिला. 


काय होती नेमकी ती घटना?
दोन वर्षपूर्वी मावळमधील पवनानगरच्या कोथूर्ण इथं सात वर्षीय मुलीची अपहरण करून अत्याचार आणि हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा, तर आरोपीच्या आईला सात वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.


मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात सात वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर आरोपीच्या आईला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. 


या संतापजनक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक केली. तेजस दळवी याच्या आईचा देखील या गुन्ह्यात सहभाग आढळला होता. खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा तिने प्रयत्न केला होता. त्याबाबत तिला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मावळमध्ये ही घटना घडल्यानंतर मावळ बंदची हाक देण्यात आली होती, तर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा एकत्र आला होता.