Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आणि गर्दी यांचे समीकरण तर तुम्हाला माहीती असेलच. ट्रेन दोन ते तीन मिनिटे उशीरा असली तरी वेळेचे पूर्ण गणित चुकते. गेल्या काही दिवसांपासून बदलापूरकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय. एक नंबर प्लॅटफॉर्मवर नियोजित जागेपेक्षा पुढे थांबत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंदच करण्यात आला आहे. नव्या होणाऱ्या पुलासाठी फलाट क्रमांक एक प्रवासासाठी बंद करणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळं रेल्वे प्रवासी मात्र संतप्त झाले आहेत. (Mumbai Local Train)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूरच्या प्रवाशांसाठी रेल्वेने होम प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मात्र,  या होम प्लॅटफॉर्मचे कामही संथ गतीने सुरू आहे. एक नंबरचा प्लॅटफॉर्म बंद केल्यामुळं आता मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल गाठण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 


बदलापुर रेल्वे स्थानकात सध्या मोठ्या प्रमाणात काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेने मुंबईच्या दिशेने असलेल्या टोकाकडून ते अगदी कर्जतच्या दिशेकडील शेवटच्या टोकापर्यंत बारा मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे काम हाती घेतलं आहे. पुलावर अत्याधुनिक सोयी सुविधाही करण्यात येणार आहे. 


पुल उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या पिलरसाठी फलाट क्रमांक एक व दोनवरील जागा अपुरी पडत आहे. त्यासाठीच रेल्वे प्रशासनाने एक नंबर फलाट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पुढील आठवड्यातच त्या ठिकाणी पोलादी कुंपण घालण्याचे काम सुरू करणार आहेत. त्यामुळं येत्या सात दिवसांत रेल्वे प्लॅटफॉर्म बंद होणार आहे. 


लोकल पकडण्यासाठी एकाच फलाटावरती खूप गर्दी होते. त्यामुळं होम प्लॅटफॉर्म झाल्यामुळं ही गर्दी विभागली जाईल, अशी आशा बदलापुरकरांना होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळं बदलापूरकर संतप्त झाले आहेत. मध्य रेल्वे विभाग मुंबई कार्यालयातून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं आता प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मवरुनच लोकल पकडावी लागणारी आहे. पण अर्धवट अवस्थेत असलेली कामे आणि प्लॅटफॉर्मची अपुरी जागा यामुळं प्रवाशांची मोठी गर्दी या प्लॅटफॉर्मवर होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत तर  प्रवाशांची गर्दी खूप असते. अशावेळी गर्दीमुळं काही अनुचित प्रकार घडू नये, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.