Sharad Pawar On Badlapur Akshay Shinde Death: बदलापूरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) सोमवारी मृत्यू झाला. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली की एन्काऊंटर करण्यात आला याबाबत तर्क-वितर्क लावले जात असून आता यावरुन राजाकरण तापल्याचं दिसत आहे. सोमवारी अक्षय शिंदेंची कोठडी संपणार होती. त्यामुळेच पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी अक्षय शिंदेंला तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) नेत असताना हा सगळा प्रकार घडला असून आता या प्रकरणासंदर्भात संशय व्यक्त केला जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून हा नैसर्गिक न्याय झाल्याचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे विरोधकांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तसेच राज्यसभा खासदार शरद पवार यांच्याबरोबर त्यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळेंनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


सुप्रिया सुळेंकडून टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला. लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफआयआर दाखल करण्यात आली खरी पण आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे," अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.



विरोधी पक्ष नेत्यांनी विचारले हे प्रश्न


विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या न्यायिक चौकशीची मागणी केली आहे. "याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे," असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.



शरद पवारांनी काय म्हटलं?


शरद पवार यांनी घटना घडल्यानंतर दीड तासांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली. "बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे," असं शरद पवार म्हणाले आहेत. 



दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी विरोधक फाशीची मागणी करत होते आता ते आरोपीची बाजू घेत आहेत असं म्हणत विरोधकांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.