चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, वांगणी : बदलापूर - वांगणी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करीत असताना या भागातील शेतकऱ्यांची भूसंपादन करून पाच वर्ष झाली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे या भूसंपादन प्रक्रियेत फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांची झाली असून मोबदल्यापासून वंचित असलेले शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१२ साली जुन्या मुंबई - पुणे महामार्गाच्या चौपदीकरणाचा प्रारंभ झाला. कल्याण-बदलापूर-वांगणी या एकूण २७.८० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम एमएमआरडीएमार्फत केले गेले. आपल्या परिसराचा वेगाने विकास होईल म्हणून शेतकऱ्यांनी संयम राखून एमएमआरडीच्या सहकाऱ्याची भूमिका घेतली होती. मात्र, प्राधिकरणाने भूसंपादनाची आणि मोबदला देण्याची देण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता या रस्त्याचे काम घाईघाईत उरकून घेतले. मात्र, आज बदलापूर ते हाळ फाट्यापर्यंतचा रस्ता संपूर्ण रस्ता सध्या पूर्णपणे उखडला असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.


बदलापूर डोणे या भागातील ३०० हून अधिक शेतकरी आजही आपल्या जमिनीचा मोबदला मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांची साधारण २२ हेक्टर जमीन या रस्त्यासाठी शासनाने घेतली आहे. मात्र, तब्बल पाच वर्षे झाले तरीही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाहीय.


सरकारने जमिनी संपादन करुन पाच वर्ष झाली तरी अजून मोबदला मिळालेला नाही. प्रस्तावित रस्ता कोणत्याही क्षणी राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होऊ शकतो, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा धोरणानुसारच मोबदला देण्यात यावा अशीही मागणी शेतकऱ्यांनी केलीय.