`हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर...`, पुण्यात बागेश्वर बाबांचं वादग्रस्त वक्तव्य
Bageshwar Dham Dhirendra Shastri In Pune: पुण्यात बुधवारपर्यंत धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग आणि दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावरुन वाद सुरु आहे.
Bageshwar Dham Dhirendra Shastri In Pune: आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायमच चर्चेत असलेल्या बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी पुण्यात पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. पुण्यात बुधवारपर्यंत धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग आणि दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावरुन वाद सुरु आहे. अशातच धीरेंद्र शास्त्री यांनी पुण्यात काल (20 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन घटनादुरुस्तीची मागणी केली आहे. पुण्यातील वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांनी धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. शास्त्राला धरुन नसलेली, वैज्ञानिक दृष्टीकोन नसलेल्या आणि घटनात्मक तरतुदींविरोधी भाष्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती आणि दावे धीरेंद्र शास्त्री हे सत्संग आणि दरबारच्या माध्यमातून करत असतात, असा दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला आहे. 'अंनिस'ने याप्रकरणी कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्रींनी पत्रकार परिषद घेतली.
मी संविधान स्वीकारतो पण...
पत्रकारांशी चर्चा करताना धीरेंद्र शास्त्रींनी हिंदूराष्ट्राची मागणी केली. आपल्या या मागणीबाबत धीरेंद्र शास्त्रींनी भूमिका मांडताना, “आपल्या पूर्वजांनी संविधानाचा स्वीकार केला. मी सुद्धा संविधानाचा स्वीकारतो. पण त्याच संविधानात आतापर्यंत 125 वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यामुळे आणखी एकदा हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती झाली तर त्यात काय वाईट आहे?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. "सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल,” असा विश्वासही धीरेंद्र शास्त्रींनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं?
धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या या मागणीनंतर पत्रकारांनी त्यांना, हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “त्यांना (मुस्लिमांना) कुठे पळण्याची गरज नाही. रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहत होते. रामराज्याच्या स्थापनेनंतर मुस्लीम किंवा ख्रिश्चनांना कुठेही पळून जाण्याची गरज नाही. हेच आम्हाला लोकांना समजावून सांगायचं आहे. रामराज्याचा अर्थ सामाजिक समरसता आहे," असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
...तर तुमची तिरडी बांधली जाईल
"हिंदूराष्ट्र या संकल्पनेचा अर्थ सगळ्यांमध्ये एकता असणे अशी आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे तुम्ही आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही असा आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे पालघरमध्ये संतांबरोबर जे घडलं ते तुम्ही पुन्हा करणार नाही असा आहे. कुणालाही पळून जाण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनात काही पाप असेल, तुम्ही पालघर हत्याकांडातील मारेकरी असाल, तुम्ही राम यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल,” असं विधानही धीरेंद्र शास्त्रींनी पत्रकारांसमोर केलं.