निर्लेप कंपनी बजाज इलेक्ट्रिकल्सने घेतली विकत
नॉनस्टिक कुकवेअर क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी निर्लेप अॅप्लायन्सेस बजाज इलेक्ट्रिकल्सने विकत घेतली आहे.
औरंगाबाद : नॉनस्टिक कुकवेअर क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी निर्लेप अॅप्लायन्सेस बजाज इलेक्ट्रिकल्सने विकत घेतली आहे. सुमारे ८० कोटी रुपयांत हा करार झाला आहे. यात निर्लेप कंपनी, ब्रँड यांची मालकी आणि देणीही बजाजकडे आली आहेत. ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या निर्लेपचा स्वयंपाकाच्या भांड्यांत नॉनस्टिक तंत्रज्ञान अवलंबणाऱ्या पहिल्या कंपन्यांत समावेश होता.
युरोपमध्ये आपली उत्पादने निर्यात करणारी ही या क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनूसार त्यांनी निर्लेपचे पूर्ण शेअर्स जवळपास ४२.५० कोटीं विकत घेण्याचे ठरवले आहे. यात अधिग्रहण होईपर्यंत कंपनीची कर्जे आणि देणी याचाही अतिरिक्त समावेश असेल.
अधिग्रहणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या किचनवेअर बाजारपेठेत कंपनीला आपली जागा भक्कम करता येईल. निर्लेपच्या उज्ज्वल भविष्यासाठी बजाजला विकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीचे प्रमुख आणि संचालक राम भोगले यांनी दिलीय. भोगले कुटूंबियांची नवी पिढी आता या उद्योगात रमणारी नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.