मी सल्ला नाही सहमती दिली होती, पवारांनी २४ तासांतच शब्द फिरवला
बालाकोट इथे हवाई हल्ल्याबाबत शरद पवारांनी २४ तासांत शब्द फिरवले आहेत.
मुंबई : बालाकोट इथे हवाई हल्ल्याबाबत शरद पवारांनी २४ तासांत शब्द फिरवले आहेत. बालाकोट हवाई हल्ल्याबाबत मी सल्ला नाही सहमती दिली होती असे पवार आज म्हणाले आहेत. पुलवामा हल्ल्याचा बदला आपण दिलेल्या सल्ल्यानेच घेतला असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल चाकणमध्ये केला होता. पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. तेव्हा माजी संरक्षणमंत्री असल्याने पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला. त्यावेळी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या, असा सल्ला दिल्याचा दावा पवारांनी केला होता. मात्र आता पवारांनी शब्द फिरवला आहे. आपण हल्ल्याबाबत सल्ला नाही तर सहमती दिली होती असे पवार म्हणत आहेत.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करा, असा सल्ला मीच सरकारला दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. ते रविवारी राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ चाकण येथे झालेल्या प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी त्यांनी म्हटले की, 'पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी माजी संरक्षणमंत्री या नात्याने मला सल्ला विचारण्यात आला. तेव्हा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय लष्कराला आदेश द्यावेत आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत', असे मी सुचवल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. पण आता या वक्तव्याला 24 तासही उलटले नसताना पवारांनी आपला शब्द फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.