पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एकदा आरपारची लढाई हवी - अण्णा हजारे
पाकिस्तानला धडा शिकविणे गरजेचे होते.
अहमदनर : भारतीय हवाई दलाने पाकिस्तान हद्दीतील जैश-ए-मोहम्मदच्या दशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हवाई हल्ला करून सर्व प्रशिक्षण स्थळ उध्वस्त केले. सकाळी केलेल्या या हवाई सर्जिकल स्ट्राईकमुळे पुलवामा हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. या हल्ल्यामुळे भारतीय सैन्याचेच नाही तर भारतीय नागरिकांचा देखील आत्मविश्वास वाढला असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतात हल्ले घडवण्याचे काम पाकिस्तान सातत्याने करत आहे. आशा हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी जातात. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात देखील अशाच प्रकारे सैन्यावर ४० जवान शहीद झाले. त्यामुळे त्यांना धडा शिकविणे गरजेचे होते. भारताने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना चांगलाच धडा मिळालाय, असे ते म्हणालेत.
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एकदा आरपारची लढाई व्हायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार सैन्य प्रमुखांना दिल्यामुळे, असा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे कोणतीही हानी न होता, हा हल्ला यशस्वी झाला. अशा प्रकारची ही दुसरी कारवाई आहे. तीसुद्धा यशस्वीरित्या झाली आहे, असे अण्णा हजारे म्हणालेत. दरम्यान, India Strikes Back भारतीय वायुदलाकडून पाकिस्तान हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. पुलवामा हल्ल्याचे उत्तर देत भारतीय वायुदलाने मंगळवारी म्हणजेच २६ फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बालाकोटा येथील जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात संपूर्ण दहशतवादी तळच उध्वस्त झाला. भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानला खडबडून जाग आली. या बैठकीनंतर पाकिस्तनचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला या हल्ल्याचे उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारताकडूनही सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.