कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामना या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा उल्लेख केला आहे. तसेच वादळात पालापाचोळा उडतोय, तो खाली बसला की खरं चित्र लोकांसमोर येईल असे म्हटले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाखतीवरुन भाजपसह (BJP) अनेकांनी टीका केली आहे. शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांची याबाबत प्रतिक्रिया देत बाळासाहेब ठाकरे प्रायव्हेट मालमत्ता नसल्याचे म्हटले आहे.


पाचोळ्यानेच करामत करून दाखवली - भरत गोगावले


"पालापाचोळा बद्दल हरकत नाही. आज जरी आम्ही पालापाचोळा असतो तरी याच पाला पाचोळ्यानेच करामत करून दाखवलेली आहे. साऱ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेले आहे की, पालापाचोळा काय करू शकतो. त्यामुळे आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही वाटचाल करत आहोत. आम्हाला काही संकेत आहेत कुणी किती बोलावं कसं बोलावं आणि काय बोलावं. त्यामुळे आम्ही वेगळं काही फार बोलू शकणार नाही. पण वेळेवर पालापाचोळा काय करू शकतो हे जनतेने पाहिले आहे," आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे. 


लोकसभा निवडणुकांमध्येही करिष्मा करून दाखवणार


"आता तर सुरुवात झालेली आहे. निवडणुकीला तीन-चार महिने राहिलेले आहेत. नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती त्यामध्ये खरी करामत काय आहे ते दिसेल आणि अडीच वर्षांनी विधानसभेची लोकसभा लोकसभेची निवडणूक आहे. त्यामध्ये मध्ये आम्ही करिष्मा करून दाखवणार आहोत," असेही गोगावले म्हणाले.


बाळासाहेब ठाकरे प्रायव्हेट मालमत्ता नाही


"बाळासाहेबांना आम्ही दैवत मानलेले आहे.  याचा अर्थ वडील जरी त्यांचे असले तरी त्यांना उंचीवर नेण्याचा काम सामान्यातला सामान्य शिवसैनिकाने केले आहे.  हे कोणालाही नाकारता येणार नाही. म्हणून ती प्रायव्हेट मालमत्ता नाही. बाळासाहेब ठाकरे हे सर्व शिवसैनिकांची मालमत्ता आहेत आणि त्यांचा वापर करून आम्ही चाललेलो आहोत. त्याचा वापर करून आम्ही पुढे चाललो आहोत. आम्ही उद्धव साहेबांची मालमत्ता वापरत नाही. बाळासाहेबांनी सर्वांसाठी केलेला जो त्याग आहे त्यात त्यागाचा विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत," असेही आमदार भरत गोगावले म्हणाले.