देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख हे बहुआयामी व्यक्तीमत्व होतं. कला आणि कलाकाराची जाण असलेले, उत्तम वक्ता, कार्टुनिस्ट, हिंदू नेता अशी अनेक बिरुद त्यांच्या नावाआधी लावली गेली. याच बाळासाहेबांनी चित्रपटात काम केलंय, असं कोणी सांगितलं तर आपल्याला नवलं वाटेल. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा चित्रपटाशी कसा संबंध आला याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. याच निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी कधी चित्रपटात काम केलं होतं का? तर त्याचं उत्तर 'हो' आहे, असं मनसेनं म्हटलंय. ठाकरे घराण्याचं आणि कलावंतांचं नातं काल-परवाचं नाही तर ते गेल्या 4 पिढ्यांचं आहे. आचार्य अत्रेंच्या आग्रहास्तव प्रबोधनकार ठाकरेंनी प्रथम 'राष्ट्रीय पुरस्कार' विजेत्या 'श्यामची आई' या मराठी चित्रपटात अभिनय केला होता हा किस्सा सगळीकडे सांगितला जातो पण बाळासाहेब ठाकरे यांनीही एका चित्रपटात काम केलं आहे, हे तितकंसं कुणाला ज्ञात नाही. मार्मिक सुरु होण्यापूर्वी बाळासाहेब व्यंगचित्रांशिवाय बोधचिन्ह, चित्रचिन्ह, चित्रपटाचे पोस्टर्स, जाहिराती असं सर्व काही काम करायचे, याची आठवण मनसेनं करुन दिलीय.  


बड्या चित्रपट निर्मिती संस्थांची बोधचिन्हही त्यांनी घडवली होती. तेव्हांच बाळासाहेब ठाकरे एका चित्रपटात झळकले होते. गुरुदत्त यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनीच मुख्य भूमिका साकारलेल्या चित्रपटात बाळासाहेबांनी शब्दशः हातभार लावला होता, असं मनसेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 


कोणता चित्रपट ?



'मिस्टर आणि मिसेस 55' हा सिनेमा 1955 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नायक गुरुदत्त यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील अनेक सीन्समध्ये गुरुदत्त त्यांना व्यंगचित्र काढताना दाखवण्यात आलं आहे. चित्रपटातील एका प्रसंगात गुरुदत्त व्यंगचित्र रेखाटताना दाखवले आहेत. त्या फ्रेममध्ये चित्र रेखाटताना गुरुदत्त यांचा क्लोजअप आहे पण जेव्हा कॅमेरा चित्राकडे वळतो तेव्हा जो रेखाटतानाचा हात आहे तो 29 वर्षीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. मनसेनं ही पोस्ट शेअर करुन बाळासाहेबांच्या लाखो चाहत्यांना नॉस्टेल्जिया अनुभवायला दिला आहे.


त्या चित्रातील फटकारे, शैली पाहिल्यानंतर तुम्हालाही तो बाळासाहेबांचा हात असल्याचे जाणवेल. त्यातली रेषा आणि शैली बाळासाहेबांचीच असल्याचे पोस्टमध्ये म्हटलंय. 


आडमुठ्या व्यक्तीच व्यंगचित्र 


आता ह्याला कर्मधर्मसहयोग म्हणा किंवा अजून काही पण चित्रपटात नायकाने ते व्यंगचित्र एका आडमुठ्या व्यक्तीविरोधात काढलं होतं आणि ते वृत्तपत्रात प्रकाशित झालं होतं.  त्यानंतर ज्या प्रवृत्तीविरोधात चित्र काढलं त्यांचा तिळपापड होणं स्वाभाविक होतं. हेच बाळासाहेबांनी राजकीय व्यंगचित्रकार आणि नेता म्हणून राजकारण्यांच्याबाबतीत केल्याची आठवण मनसेनं जागवली आहे. 


व्यंगचित्रकार ते राज्यकर्ता


एक व्यंगचित्रकार चित्रांच्या माध्यमातून जनमानस चेतवतो, त्यांचं रूपांतर संघटनेत होतं, अनेक सामान्य घरातील माणसं सत्तेच्या पदापर्यंत पोहोचतात आणि स्वतःच्या संघटनेची राज्यावर सत्ता येते. व्यंगचित्रकार ते राज्यकर्ता हा प्रवास इतका विलक्षण आहे की नंतर 'बाळासाहेब ठाकरे' हे व्यक्तिमत्त्वच चित्रपटाचा विषय बनतं. चित्रपटसृष्टीतलं एक असंही वर्तुळ बाळासाहेबांनी पूर्ण केलंय. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना 'भारतरत्न' सन्मान मिळायलाच हवा, अशी मागणी यानमित्ताने मनसेकडून करण्यात आली आहे.