अश्विनी पवार , झी मिडीया , पुणे : विविध मागण्यांसाठी सुरू असलेला अंगणाडी सेविकांचा संप नुकताच संपला. या संपानंतर आता पुण्यातील शिक्षण मंडळाच्या बालवाडी शिक्षिका आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बालवाडी शिक्षिकांच्या विविध मागण्यांकडे पुणे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा या शिक्षिकांचा आरोप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील शिक्षण मंडळाच्या बालवाड्यांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षिका आणि काम करणाऱ्या सेविका गेली अनेक वर्षे वेतनवाढ होईल या आशेने सरकारच्या निर्णयाकडे डोळे लाऊन बसल्या आहेत. पुणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या ३०० बालवाड्यांमध्ये ५१९ बालवाडी शिक्षिका व ४९८ सेविका आहेत. मात्र गेली २० वर्षे या सेविका व शिक्षिका एकाच मानधनावर काम आहेत. महापालिकेने या शिक्षिकांच्या वेतनवाढीचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. वेतन वाढीसोबतच वैद्यकीय रजा आणि इतर सुविधा पुरविण्याची मागणीही या बालवाडीच्या शिक्षीकांनी केली आहे.


राज्य शासनाच्या शिक्षण धोरणामध्ये बालवाड्यांना कुठेही औपचारिक मान्यता दिलेली नाही. त्यामुळे बालवाडीसाठी राज्य शासनाची कोणतीही नियमावली नाही. शिक्षण हक्क कायद्यामधूनही ३ ते ६ वर्षांदरम्यान देण्यात येणाऱ्या बालशिक्षणाला वगऴण्यात आलं आहे. त्यामुळेच बालवाडी आणि बालशिक्षण यांचे प्रश्न शासनाकडूम अनेकदा दुर्लक्षित राहतात. त्यामुळे हे प्रश्न कायमचे सोडविण्यासाठी बालशिक्षणासाठी योग्य तू तरतूद करण्याची मागणीही या निमित्ताने पुढे येत आहे.


महत्त्वाचे असे की, शिक्षण मंडळाच्या बालवाडी शिक्षिकांच्या या प्रश्नांमुळे पालकांचा कलही खाजगी बालवाडी कडे वाढताना दिसतोय. त्यामुळे या शिक्षीकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याबरोबरच प्रशासनानं बालशिक्षणाची योग्य अमंलबजावणी करणंही तितकचं आवश्यक बनलं असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.