Shiv Rajyabhishek Sohala 2023: मुंबई - गोवा महामार्गासह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.1 आणि 2 जून तसेच 5 आणि 6 जून रोजी अवजड वाहनांना बंदी असेल. 16 टन आणि त्यापेक्षा जास्त वजन क्षमतेची जड वाहनं, ट्रक, मल्टी अ‍ॅक्सल ट्रेलरना वाहतुकीसाठी बंदी असेल.


रायगडावर राज्याभिषेक सोहळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्यभिषेक दिन साजरा केला जात आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस यावर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. पोलिसांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला मार्ग हा सातारा-कोल्हापूरकडून येणार आहे. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड मार्गे स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोंझर-1 आणि कोंझर 2 इथे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. 


 या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था


याशिवाय, वाळसुरे 1 येथेही पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. याठिकाणी वाहने पार्क करुन शिवप्रेमींना एसटीच्या शटल सेवेने रायगडाच्या दिशेने जाता येईल. कोंझर 3 ते पाचाड अशी एसटीची शटल सेवा सुरु राहील. एसटीने पाचाडपर्यंत पोहोचल्यानंतर शिवप्रेमींना किल्ले रायगडापर्यंतचा प्रवास पायीच करावा लागेल. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली रोप वे सेवा राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सुरु असेल.


तसेच दुसरा मार्ग हा मुंबईहून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आहे. मुंबई, माणगाव, दालघर फाटा, कवळीचा मार्ग आणि सोनजई मंदिर असा हा प्रवास असेल. मुंबईकडून येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांसाठी सोनजई मंदिराच्या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. तर पुणे, ताम्हणी घाट, निजामपूर आणि सोनजई मंदिर असा प्रवास करत येणाऱ्या शिवभक्तांसाठीही याच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.


किल्ले रायगडावर दुर्घटना, शॉक लागून कामगाराचा मृत्यू 


किल्ले रायगडावर सजावटीचे काम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाला. रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. मृत कामगाराचे नाव समजू शकले नाही. किल्ले रायगडावर यंदा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. त्याची जय्यत तयारी केली जात आहे. त्यासाठी राजसदरे समोर शिवकालीन राज दरबाराची प्रतिकृती उभारली जात आहे. हे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली. कामगाराचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.