नवी मुंबई : Bank loan recovery, Elderly man commits suicide :एक धक्कादायक बातमी. कर्जवसुलीसाठी बँकेकडून आलेल्या लोकांनी तगादा लावताना धमकी दिली. पैसे दिले नाहीत तर घरातील सामान घेऊन जाऊ, अशी धमकी दिल्यानंतर तणावाखाली येत वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जाच्या थकीत हाफत्याच्या वसुलीसाठी तगादा लावत धमकावल्याने एका वृद्ध इसमाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. पीडित व्यक्तीच्या सूनेने आणि इतर चार जणांनी खारघर येथील ग्रेटर बँकेतून 3 लाखांचे सामूहिक कर्ज काढले होते. या कर्जाचे काही हफ्ते फेडलेत. मात्र, लॉकडाऊनमुळे काही हफ्ते शिल्लक होते. या उर्वरित हाफत्याच्या वसुलीसाठी बँकेचे कर्मचारी वारंवार घरी येऊन पैशांसाठी तगादा लावत होते. 


अशाचप्रकारे सोमवारी देखील बँकेकडून दोन महिला आणि एक पुरुष कर्मचारी आत्महत्या केलेल्या वृद्धाच्या घरी येऊन पैशासाठी तगादा लावत होते. मात्र उद्या पैसे भरतो असे सांगूनही आताच पैसे भर नाहीतर आम्ही घरातील सामान घेऊन जातो, अशी धमकी कर्मचारी देत होते. या तणावाखाली घरातील वृद्धाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चुकीच्या पद्धतीने वसुलीची प्रक्रिया झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. याघटनेची अधिक चौकशी सुरु असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी  दिली.