बँक ऑफ बडोदा दरोडा : बॅंक प्रशासनाला शिवसेनेचा दणका
बँक ऑफ बडोद शाखेवर मंगळवारी दरोडा पडल्यानंतर बँक प्रशासनाने चक्क हात वर केले होते.
नवी मुंबई : येथील बँक ऑफ बडोद शाखेवर मंगळवारी दरोडा पडल्यानंतर बँक प्रशासनाने चक्क हात वर केले होते. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे नुकसान कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. बॅंकेची भूमिका समजताच आज शिवसेनेने धडक देत बॅंक प्रशासनाला वठणीवर आणले.
शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सहा तास घेराव घातला. फोडलेल्या लॉकर्सची जबाबदारी घेणार की नाही, असा जाब शिवसेना स्टाईलने विचारताच बॅंक प्रशासन वठणीवर आले. बॅंकेने लेखी हमी दिली. त्यामुळे ज्यांचे लॉकर फोडले केलेत त्यांना दिलासा मिळालाय.
बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर येथील शाखेवर दरोडा पडल्यानंतर लॉकर्सधारकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. बँकेच्या ३० लॉकर्समध्ये २ कोटी पेक्षा जास्त ऐवज होता. हा ऐवज देण्याबाबत बँकेच्या प्रशासनाने ग्राहकांची जबाबदारी धुडकावून लावली होती.
आज, खासदार विचारे यांनी धडक देऊन तुमच्या निष्काळजीपणाचा त्रास ग्राहकांना का, असा सवाल उपस्थित केला. बँकेत सीसी कॅमेरे, सुरक्षा रक्षक किंवा धोक्याच्या सूचना देणारे गजर न बसविल्यानेच दरोडेखोरांचे फावल्या आरोप विचारे यांनी केला. या प्रकरणात बँकेचे मॅनेजर तसेच अधिकारी व कर्मचारीदेखील जबाबदार असून त्यांना पाठीशी घालू नका, असे विचारे यांनी ठणकावले. त्यानंतर बॅंकेने लेखी हमी दिली.