विम्याची रक्कम लाटण्यासाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, वेबसिरीज पाहून एका अनोळखी व्यक्तीला...
Crime News Today: विम्याची रक्कम लाटण्यासाठी एका व्यक्तीने वेबसिरीज पाहून कट रचला. मात्र तो त्याच्यावरच उलटला आहे.
Crime News Today: विम्याची रक्कम लाटण्यासाठी एका व्यक्तीने केलेले कृत्य पाहून तुम्हीही हैराण व्हाल. राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात एका व्यक्तीने कर्ज फेडण्यासाठी एक हत्या घडवून आणली आहे. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने एका बेवारस भिकाऱ्याची हत्या केली नंतर स्वतःची कागदपत्र मृतदेहाशेजारी ठेवून स्वतःलाच मृत समजून विमाचा क्लेम मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा डाव फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पोलिसांना काही दिवसांपूर्वीच महामार्गालगत एक मृतदेह सापडला होता. अपघातात मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. त्याचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणे मुश्कील होते. मात्र, मृतदेहाशेजारीच एक बॅग सापडली होती. त्यात अनेक दस्तावेज होते. या दस्तावेजानुसार, अजमेर गावचे गुवारडी येथे राहणाऱ्या नरेंद्र सिंह रावत याचे नाव होते. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नरेंद्र सिंह रावतच्या नातेवाईकांना बोलवले. मात्र, नातेवाईकांनी हा मृतदेह नरेंद्र सिंह यांचा नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी नरेंद्र सिंह यांचा ड्रायव्हर भैरुलाल याच्यापर्यंत पोहोचले. सुरुवातीला त्याने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्य दाखवताच त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांना सापडलेला मृतदेह तुफानसिंह नावाच्या भिकाऱ्याचा आहे. त्याला मारुन मृतदेहाला नरेंद्र सिंह यांची ओळख देण्याची आयडिया एका वेबसिरीजनुसार सुचल्याचे त्याने म्हटलं. नरेंद्र सिंह रावत यानेच सगळा बनाव रचला असल्याचे त्याने कबुली दिली.
सुरुवातीला एका बेवारस व्यक्तीचा शोध भैरुलाल आणि नरेंद्र यांनी सुरु केला. तेव्हा त्याला तुफानसिंह सापडला. त्याला नोकरी देण्याचे आमिष दाखवून सोबत आणले आणि भरपूर दारू पाजली. नंतर त्याला एका रस्त्यावर झोपवून ट्रेलरखाली चिरडले. नरेंद्रवर प्रचंड कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचण्याची योजना आखली होती. विम्याची रक्कम लाटून कर्ज फेडण्याची त्याची योजना होती.