Bar Headed Goose : विमान आणि ट्रेनपेक्षा सुपरफास्ट स्पीड; दिवसाला 1600 किमी उडण्याची क्षमता असलेला पक्षी
Bar Headed Goose : हिमालय पर्वता एवढ्या म्हणजेच 28 हजार फूट उंचीवर उडणारे हे पक्षी आहेत. हे पक्षी हिमालयातून, तिबेट, कझाकस्तान, रशिया आणि मंगोलियामार्गे उडतात. त्या राजहंस पक्षाचे थवे येथे येतात.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : ऋतु बदलानुसार अनेक बदल होत असतात. ऋतु बदलानुसार अनेक दुर्मीळ पक्षी देखील स्थालांतर करत असतात. लाखो किमी प्रवास करुन असे अनेक पक्षी महाराष्ट्रात देखील येत असतात. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या सावरगाव तलावावर 10 परदेशी राजहंस पक्षाचे दर्शन झाले आहे. 1600 किमी उडण्याची क्षमता असलेल्या या राजहंसाच्या (Bar-headed goose) कळपाने सावरगावच्या तलावासह संपूर्ण विदर्भातील तलावांमध्ये तळ ठोकला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या सावरगाव येथील तलावावर दरवर्षी परदेशी पक्षी येत असतात. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या तलावावर अनेक स्थलांतरित पक्षी दर्शन देत आहेत. Bar-headed goose असे इंग्रजी नाव असलेले राजहंस सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घते आहेत.
हिमालय पर्वता एवढ्या म्हणजेच 28 हजार फूट उंचीवर उडणारे हे पक्षी आहेत. हे पक्षी हिमालयातून, तिबेट, कझाकस्तान, रशिया आणि मंगोलियामार्गे उडतात. त्या राजहंस पक्षाचे थवे येथे येतात. हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबरच्या महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात येतात. मार्चच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीस परत जातात.
एका दिवसात 1600 किमी उडण्याची क्षमता असलेल्या या राजहंसाच्या कळपाने सावरगावच्या तलावासह संपूर्ण विदर्भातील तलावांमध्ये तळ ठोकला आहे. त्यांना या तलावाचा भवताल आवडलाय म्हणूनच दरवर्षी इथे येत असतात. दोन ते तीन किलो वजनाच्या या राजहंस च्या डोक्यावर आणि मानेवर काळ्या खुणा असतात आणि त्यांचा रंग फिकट राखाडी असतो.
या राजहंसांच्या डोक्यावर दोन काळ्या पट्ट्यांसह पांढरा रंग असतो. पाय मजबूत आणि केशरी रंगाचे असतात. सावरगाव तलावात सध्या दहा 10 राजहंस चे दर्शन झाले आहे. याशिवाय चक्रांग , तलवार बदक , थापाट्या, नदीसुराई, शेकाट्या, करकोचा, इत्यादी अनेक पक्षी हे पक्षीमित्र व स्वाब संस्था पक्षी अभ्यासकांच्या निदर्शनास आले.