Baramati Loksabha : बारामती लोकसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी तगडी लढत बारामतीमध्ये होणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे बारामतीमध्ये शुक्रवारी सुप्रिया सुळेंनी नारळ वाढवत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांच्याही प्रचाराचा नारळ फुटला आहे. प्रचाराच्या पहिल्याच सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ही गावकी भाऊकीची किंवा नणंद भावजयची निवडणूक नाही. देशाच्या 135 कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक सासू-सुनेची, नणंद भावजयीची निवडणूक नाही. ही भावकीची निवडणूक नाही ही मोदी साहेब आणि राहुल गांधींची निवडणूक आहे. माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. पण त्यांच्या आरोपामुळे मला काय भोकं पडत नाही. बारामतीची जनता मला अनेक वर्षे ओळखते. माझं लहाणपण येथेच गेलंय," असे अजित पवार म्हणाले.


"कालच्या शरद पवारांच्या सभेत अमेरिका टाईम्सचा पत्रकारासह अनेक पत्रकार मंडळी आली होती. यावेळी शरद पवार खुर्चीवर बसले होते. तर सुप्रिया, रोहित आणि युगेंद्र पायापाशी बसले होते. अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते होते. म्हणजे हे अमेरिकेतही पोहोचलं की बघा कुटुंब कसं एक आहे. पण मी त्यांच्याबरोबर होतो तेव्हा साहेब एकेठिकाणी बसले असतील तर मी दुसरीकडे बसायचो. बारामतीतील सहकारी साखर कारखाने हे शरद पवार यांनी आणलेले नसून ते त्या त्या भागातील जुन्या जाणत्या व्यक्तींना आणल्या आहेत," असं प्रत्युत्तर अजित पवारांनी शरद पवारांना दिलं आहे.


आमच्या कुटुंबातील सर्व राजकारणात सक्रिय


"आम्ही पण आमच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. काहीजण म्हणतात धमक्या दिल्या जातात. पण मी मनापासून व्यासपीठावरून खाली मान घालून बसलो आहे. कोणी काही बोलले तरी मी काय कुणाला बोलतोय का? यापूर्वी म्हणायचे फक्त दुसऱ्या पिढीतील दादा राजकारणात आहे. त्यामुळे घरातील फक्त मी राजकारणात होतो. बाकी सगळेजण धंदापाणी करत होते. मात्र मागील दोन महिन्यापासून आमच्या कुटुंबातील सर्वांनी धंदा पाणी सोडून राजकारणात सक्रिय भाग घेतलाय. गळ्या शप्पथ खरं बोलतोय," असे अजित पवार म्हणाले.


कचा कचा म्हणाल्यावर नोटीस येते - अजित पवार


"आपण भावनिक न होता बारामतीचा आपल्या विचारांचा खासदार दिला तर आपल्याला निधी कमी पडणार नाही. पूर्वी विहिरी खांदायला बराच काळ जायचा. मात्र त्यानंतर पोकलेन मशीनने कचाकचा खोदल्या जायला लागल्या.  मला तर कचा कचा कचा म्हणाल्यावर नोटीसच येते," असेही अजित पवार म्हणाले.


रोहित पवार आता जास्तीचे बोलू लागले आहेत


"आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी माझ्या पाठीमागे लागून रोहितला जिल्हा परिषद सदस्य करा असे म्हटले होते. त्यावेळी मी शरद पवारांचा विरोध करून त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं. पुढे ते हडपसर   विधानसभा मागू लागले. मात्र मी त्यांना कर्जत जामखेडचे आमदार केले. तेच आता जास्तीचे बोलू लागले आहेत," अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांवर टीका केली. यासोबत काहींना तर आमदारकीची स्वप्न पडू लागले आहेत असे म्हणत युगेंद्र पवार यांच्यावरही निशाणा साधला.


"आता आमच्या नरेंद्र मोदी, अमित शहा  यांच्याशी ओळख व्हायला लागल्या आहेत. पहिले फक्त आम्ही राब राब राबयचो. सर्वांनी आता घड्याळाच्या कामाला लागावं. याचे दोन अर्थ निघतात नाहीतर मला कामालाच लावाल. कालच्या सभेला होते आणि आजही आहेत अशांनी हात वर करा. बघा वर हात झालेत. दोन्ही दगडीवर हात नकारे ठेवू," असे म्हणताच सभेत हशा पिकला. यासोबत गावातील गटतट विसरून घड्याळाला मतदान करण्यासाठी प्रयत्न करा. कार्यकर्त्यांशी समन्वय ठेवा आणि मित्र पक्षांना महत्त्व द्या, असाही सल्ला अजित पवार यांनी दिला.