Baramati Namo Maharojgar Melava 2024: बारामतीमध्ये शनिवारी राज्य सरकारच्या नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख नाही. असं असलं तरी शरद पवारांनी मात्र मुख्यमंत्र्यांबरोबरच दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे. ‘गोविंदबागेत जेवायला या' असा निरोपच शरद पवार तिन्ही नेत्यांना पाठवला आहे. शरद पवार डिप्लोमसीची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच आता या तिन्ही नेत्यांनी शरद पवारांचं आमंत्रण स्वीकरलं नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


तिन्ही नेत्यांना आमंत्रण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आहे. मात्र शरद पवारांचं नाव मात्र या कार्यक्रमपत्रिकेत नाही. सुप्रिया सुळे यांनी पत्रिकेत नाव असले तरी आपल्याला निमंत्रण नसल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. हा कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानमध्ये आहे. ही संस्था शरद पवारांनी स्थापन केली आहे. जर कार्यक्रमाला बोलावलं तर लोकप्रतिनिधी या नात्याने तिथे उपस्थित राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र हा सगळा संभ्रम सुरु असतानाच शरद पवारांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या सरकारमधील प्रमुख नेत्यांना घरी जेवायला या असं आमंत्रण दिलं आहे. पण हे आमंत्रण या तिन्ही नेत्यांनी फेटाळल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.


संजय राऊत काय म्हणाले?


पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी दिलेल्या आमंत्रणाचा संदर्भ राऊत यांनी दिला. मात्र बारामतीत कार्यक्रम होत असून शरद पवारांना न बोलवणं हस्यास्पद असल्याचं राऊत म्हणाले. "विद्या प्रतिष्ठानच्या प्रणांगणात एका सरकारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुम्ही तेथील खासदार सुप्रिया सुळे तसेच शरद पवारांना आमंत्रित केलं नाही. हे फार हास्यपद आहे," असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, "या ठिकाणी शरद पवार सर्वोच्च स्थानी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांचा मान ठेऊन जेवणाचं निमंत्रण दिलं. तुम्ही आमच्या मतदारसंघात आला आहात. आमचं तिथे घरही आहे तर हे आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला जेवणाला, चहापानाला बोलवावं. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवलं. मात्र या तिघांनी शरद पवारांचं निमंत्रण स्वीकारलेलं नाही, अशी माझी माहिती आहे. माझं सकाळी शरद पवारांबरोबर बोलणं झालं," असं संजय राऊत म्हणालेत.