Baramati Namo Raojgar Melava : बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमात एकाच मंचावर आहेत. बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या आवारात हा कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. तुम्ही काम करा पण गृहखातं मिळणार नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन झालं. या नमो रोजगार मेळाव्यात बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसाठी केलेल्या कामासाठी अजित पवार यांचे कौतुक केले.


"गेल्या दोन तीन दिवसांत माध्यमे आणि त्यांच्या प्रतिनिधींना काम मिळाले आहे. त्यांच्यामुळे प्रसिद्धी मिळाली. अशा कामात राजकारण बाजूला ठेवून एकत्र येतो त्याचे उदाहरण इथे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या पुढाकारातून हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात 55 हजार पदे आहेत. यासाठी अर्ज कमी आणि पदे जास्त आहेत. त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार मिळणार आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


"आम्ही राजकारणी कंत्राटी रोजगार आहोत. आम्हाला पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळते. चांगलं काम केलं तर पुन्हा संधी मिळते नाहीतर घरी बसावे लागते. अजित पवारांनी इतक्या उत्तम इमारती केल्या की त्याचे पीएमसी त्यांना द्यावे असं मला वाटते. पण ते म्हणतील खातेच मला द्या. पण तसे होणार नाही, खाते माझ्याकडेच ठेवणार," अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीसांनी केली.