जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : अजित पवारांना आता घरातूनच विरोध होऊ लागलाय. कारण अजित पवारांचा सख्खा पुतण्याच त्यांच्याविरोधात उभा ठाकलाय. अजित पवारांचे (Ajit Pawar) धाकटे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार (Yugendra Pawar) बारामतीत सक्रीय झालाय. शरद पवार (Sharad Pawar) म्हणतील तीच आपली भूमिका म्हणत युगेंद्र पवारांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय.  शरद पवारांनी सांगितल्यास बारामतीतही राजकीय दौरे करण्याचा इरादा युगेंद्र यांनी बोलून दाखवलाय. अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्यानेच काकांविरोधात रणशिंग फुंकल्याचं बोललं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूटीनंतर अजित पवारांनी बारामतीत भावनिकतेच्या राजकारणावरुन थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला. तर सुप्रिया सुळेंवरही (Supriya Sule) पहिल्यांदाच जाहीर निशाणा साधला. पवार कुटुंबातून कोणीही आपल्यासाठी प्रचार करणार नाही. बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी एकटं पाडू नये असं आवाहनही अजित पवारांनी केलं होतं. 


तर अजित पवारांना कुटुंबाने एकटे पाडलेले नाही असं थेट विधान त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवारांनी केलंय. अजित पवार जेव्हा जेव्हा नाराज झाले तेव्हा तेव्हा त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांच्या घरी महत्त्वाच्या बैठका आणि चर्चा झाल्या.  श्रीनिवास पवार यांनी आपला भाऊ अजित पवार यांना अनेक बऱ्या वाईट प्रसंगात आजवर साथ दिलेली आहे. मात्र आता श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवारच अजित पवारांविरोधात मैदानात उतरलाय. 


कोण आहेत युगेंद्र पवार ? 
युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. अजित पवारांचे सख्खे धाकटे भाऊ श्रीनिवास यांचे ते पुत्र. युगेंद्र पवार यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं असून ते शरयू अॅग्रोचे सीईओ आहेत. शिवाय बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद ते भूषवतायत. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदही त्यांच्याकडे आहे. 


बारामतीत युगेंद्र पवार सक्रीय आहेत. शांत आणि संयमी अशी ओळख असणारे युगेंद्र तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी सातत्याने आजोबांना साथ दिलीय. बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र ही लढत खऱ्या अर्थाने अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच होणार आहे. यात आता सुप्रिया सुळेंच्या मदतीला युगेंद्र पवार हा आश्वासक तरुण चेहरा आलाय. सुप्रिया सुळेंसाठी युगेंद्र पवारांना मैदानात उतरवण्याची ही शरद पवारांची खेळी असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे बारामतीच्या लढाईत अजित पवार एकटे पडल्याचंच चित्र सध्या दिसतंय.