महाविकास आघाडी आणि महायुतीत नरेटिव्हची लढाई; नड्डांच्या आदेशानं भाजप कामाला
राजकारण म्हटलं की नरेटिव्हचा मुद्दा येतोच.. विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आणि महायुतीमध्ये नरेटिव्हची लढाई होण्याची शक्यता आहे.
JP Nadda BJP Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात नरेटिव्हचा मुद्दा चांगलाच तापतोय. विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप सत्ताधा-यांकडून नेहमीच केला जातोय...आता विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपनं तयारी केलीय..
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधान बदल आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून इंडिया आघाडीनं एनडीएला जोरदार टार्गेट केलं होतं.. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर देशातील संविधान बदललं जाईल असा प्रचार इंडिया आघाडीनं केला, पर्यायी महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला.. यामधून भाजपनं धडा घेतल्याचं पहायला मिळतयं.. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे एकदिवसीय मुंबई दौ-यावर आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्याचे आदेश दिलेत...
आंदोलनातून विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर द्या, राहुल गांधींचं विधान तळागाळापर्यंत पोहोचवा, 'महायुतीनं केलेल्या फेक नरेटिव्हचा दावा खोडून टाका', 'विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जा मविआच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी तयारीला लागा नरेटिव्हबद्दल असे आदेश जे पी नड्डा यांनी भाजप पदाधिका-यांना दिले आहेत.
विरोधकांच्या नरेटिव्हमुळे लोकसभा निव़डणुकीत मिळालेलं अपयश, विधानसभेत टाळण्यासाठी महाराष्ट्र भाजपानं तयारी सुरु केलीय.. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून नरेटिव्हला नरेटिव्हनं प्रत्युत्तर देण्यात येणारंय....त्यामुळे महायुती आणि मविआमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेटिव्हची नवीन लढाई सुरू होणारंय.
अजित पवारांशी जुळवून घेण्याचे आदेश
राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी भाजपच्या केंद्र स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...भाजपनं मोठ्या भावाची भूमिका बजावताना दोन्ही भावांना सांभाळून घेण्याचे निर्देशही जे.पी. नड्डांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...मुंबई दौ-यावर असताना नड्डांची सागर बंगल्यावर भाजप नेत्यांबरोबर बैठक झाली त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना हे निर्देश दिल्याचं सूत्रांकडून समजतंय...