नवं घर खरेदी करणार असाल तर आधी ही बातमी वाचा! `महारेरा`च्या नावे सुरु आहे मोठा घोटाळा
Maharera Bogus Certificate: ‘महारेरा’च्या (Maharera) बनावट नोंदणीचा सुळसुळाट सुरु असून ग्राहकांची लूट केली जात आहे. कल्याण डोंबिवलीत याप्रकरणी 65 गृहप्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Maharera Bogus Certificate: आपल्या हक्काचं, स्वप्नातलं घर घ्यावं यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. अनेकदा आपल्या क्षमतेच्या बाहेर जात बँकेकडून कर्ज काढत हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाता प्रयत्न असतो. पण हे स्वप्न जेव्हा धुळीस मिळतं तेव्हा होणाऱ्या यातनाही असह्य असतात. यामुळेच घर घेताना प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून घेणं महत्त्वाचं असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात महारेराच्या (Maharera) नावे बनावट नोंदणीपत्र (Bogus Registration Certificate) दाखत तुमची फसवणूक केली जाऊ शकते.
महारेराच्या बनावट नोंदणीचा सध्या सुळसुळाट सुरु आहे. अनेक ठिकाणी महारेराचे बनावट क्रमांक देऊन बांधकामं केली जात आहेत. भूमाफियांनी महापालिकेच्या बांधकाम मंजुरीची बनावट कागदपत्रं तयार केली आहेत. त्यातून अनेकजणांची फसवणूक केली जात असून, आता त्यांनी पोलिसांत धाव घेत दाद मागितली आहे.
अधिकृत गृहप्रकल्पांच्या जवळच हे बेकायदा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी तुलनेने घरांच्या किंमती कमी ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे ग्राहक साहजिकपणे त्यांना प्राधान्य देतात. मात्र यावेळी ग्राहकांना ‘महारेरा’ची बनावट नोंदणी प्रमाणपत्र दाखवली जात आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही महारेराच्या नावे फसवणूक सुरु असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी मानपाडा, रामनगर या दोन पोलीस ठाण्यात 65 गृह प्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या गृह प्रकल्पांच्या माध्यमातून बेकायदा बांधकाम करताना बनावट नोंदणी दाखवली जात होती.
महारेराच्या नावे सुरु असलेला हा घोटाळा फक्त कल्याण-डोंबिवलीच नाही तर कळवा, मुंब्रा, दिवा येथेही सुरु आहे. यामध्ये डोंबिवलीलगतची 27 गावं आहेत. तसंच भिवंडीलगत असलेल्या खारबाव, मिठगावसारख्या पट्टयातील काही इमारतींचा समावेश आहे.
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर महारेरा ठाणे आणि नजीकच्या भागातील बांधकामांना प्रमाणपत्र देताना आधीपेक्षा जास्त काळजी घेत आहे. याआधी बांधकाम मंजुरीसाठी तीन दिवसांत मिळणारी परवानगी मिळण्यास महिन्याभराचा वेळ लागत आहे.