किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक :  पाणीपुरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सूटतं...मात्र जर तुम्ही पाणीपुरी खात असाल तर सावधान.. असं सांगण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. नाशिकमध्ये या पाणीपुरीबाबत एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ते बघून पाणीपुरी खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सडलेले बटाटे, कलरमिश्रित चटणी, खराब तेल, दुर्गंधीयुक्त हरभरे, उघड्यावर पडलेल्या पुऱ्या आणि पाणीपुरीसाठी लागणारं सर्व साहित्य जिथे ठेवण्यात आलं होतं ती ही जागा. बुधवारी नाशिकच्या सातपूर परिसरातील बजरंग नगरच्या मळे परिसरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता अभियानाअंतर्गत पाहणी दौरा सुरु होता. यावेळी हे पथक मूळचे मध्यप्रदेशचे असलेले दिवान सिंग यांच्या पाणीपुरीच्या दुकानाजवळ पोहचले तेव्हा हा सर्व गलिच्छ प्रकार समोर आला. 


पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व साहित्य जमा केले आणि अस्वच्छता, प्लास्टिकचा वापर तसेच पाणीपुरीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या प्रकरणी दिवानसिंगला ५ हजार रुपयांचा दंड ही ठोठावला.


पाणीपुरी हा अनेकांचा वीक पाँईंट आहे. पण पाणीपुरीच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असेल तर ही नक्कीच गंभीर बाब आहे. अशी लोकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याआधी देखील पाणीपुरी संबंधिक अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.


अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न औषध विभाग कार्यरत असतो मात्र तो फक्त नावालाच असल्याचं बघायला मिळातं. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.