सचिन कसबे, झी 24 तास : कोरोना काळात अगदी पेमेंट करण्यापासून ते बिल भरण्यापर्यंत सगळं काही ऑनलाईन पद्धतीने करण्यावर भर दिला. आता तरुण असो वा वयोवृद्ध ऑनलाईन पेमेंट करणं पसंत करतात. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांची किंवा बिलं भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येसोबत धोकाही वाढताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर ऑनलाईन बिल भरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. तुमच्यासोबतही असं घडू शकतं. त्यामुळे तुम्ही बिल भरताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. 


मोबाईलवर पाठवलेल्या लिंक वरून जर वीजबिल भरणार असाल तर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. कारण अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथे घडली.


मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे राहणारे मधुकर वामन कुलकर्णी हे 77 वर्षांचे आहेत. सांगली येथून भूमी अभिलेख कार्यालयातील सेवा निवृत्त झाल्यानंतर आपल्या मुळ गावी वास्तव्यास आले.


कुलकर्णी यांच्या मोबाईलवर राहुल शर्मा या व्यक्तीने फोन केला.मी महावितरण ऑफिसमधून बोलत आहे, तुमच्या घराचे लाईट बिल भरले नसल्यामुळे वीज कनेक्शन बंद करण्यात येत असल्याचं त्याने सांगितले. जर असे करायचे नसेल तर मोबाईलवर पाठवलेली लिंक डाऊनलोड करायला सांगितली.


शर्मा याने कुलकर्णी यांच्या मोबाईलमधील एसबीआय योनो अ‍ॅपवर नियंत्रण मिळवले. लाईट बिल तपासण्याच्या नावाखाली फिर्यादीचा युजर आय डी पासवर्ड विचारून घेतला. वयोवृद्ध असल्याचा फायदा घेऊन त्याने 4 लाख 61 हजार 500 रुपये रक्कम काढून घेतली. कुलकर्णी यांच्या मोबाईलवर पैसे डेबीट झाल्याचा मेसेज आला.


कुलकर्णी यांनी मंगळवेढयातील स्टेट बँकेत जाऊन खात्याची डिटेल्स तपासले. पेन्शन खाते आणि सेव्हिंग खात्यातून रक्कम डेबीट झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक करणाऱ्याविरूद्ध तक्रार दिली. याचा अधिक तपास पोलीस निरिक्षक रणजित माने हे करीत आहेत


नागरिकांनी आपले बँक खाते नंबर, ए.टी.एम. पासवर्ड, कोड नंबर कोणालाही सांगू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसंच कोणत्याही लिंकवर क्लीक करू नका, कोणालाही आपली माहिती देऊ नका असंही सांगण्यात आलं आहे.