सावधान! तुम्हीही ठराल हनीट्रॅपचा बळी, कोल्हापूरात तरुणाची आत्महत्या
तरुणीच्या धमकीला घाबरत तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली, याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : सोशल मीडियावर (Social Media) तरुणीची मैत्री करणं कोल्हापूरमधल्या (Kolhapur) एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. हनीट्रॅपमध्ये (Honey trap case) अडकलेल्या इचलकरंजीमधल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस तपासात हा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष निकम असं आत्महत्या केलेल्या तरुणाचा नाव असून तो यंत्रमाग कामगार होता.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संतोषची नेहा शर्मा (Neha Sharma) नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली. ओळखीचं रुपांत मैत्रीत झालं, दोघांचे चॅटिंग आणि व्हिडिओ संवाद सुरु झाले. नेहा शर्माने संतोषला आपल्या बोलण्यात फसवलं आणि संतोषचा व्हॉट्सअॅप नंबर घेतला. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉल करत या तरुणीने अश्लील चाळ करायला सुरुवात केली. यानंतर या तरुणीने संतोषलाही नग्न होण्यास भाग पाडलं.
हा सर्व प्रकार या तरुणीने रेकॉर्ड केला आणि त्यानंतर तीने संतोषकडे पैशाचा तगादा सुरु केला. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी या तरुणीने दिली. यामुळे घाबरलेल्या संतोषने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी संतोषचा मोबाईल तपासल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या घटनेची नोंद इचलकरंजीमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.
त्यामुळे सोशल मीडियाद्वारे र तुम्हाला अनोळखी महिला चॅटिंग किंवा व्हिडिओ कॉल करत असतील तर ते टाळा किंवा संपर्क टाळा. कदाचित तुमचीही फसवणूक होऊ शकते.