दुष्काळात तेरावा महिना, परळी वीज निर्मिती केंद्राचे पाच संच बंद
राज्यात लोडशेडिंगचा त्रास वाढलेला असताना परळीतील औष्णिक वीज निर्मिती केंद्राची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय.
बीड : राज्यात लोडशेडिंगचा त्रास वाढलेला असताना परळीतील औष्णिक वीज निर्मिती केंद्राची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. परळीच्या वीज निर्मिती केंद्राचे पाच संच बंद पडल्यामुळे तब्बल 1 हजार मेगावॅट वीज निर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळं राज्यावरील लोडशेडिंगचे संकट अधिक गडद झालंय.
परळीच्या वीज केंद्रातून 1250 मेगावॅट विजेची निर्मिती होते. मात्र आता केवळ दोनच संच सुरू असल्यामुळे केवळ 250 मेगावॅट विजेचीच निर्मिती होणार आहे. त्यामुळं विजेच संकट अधिकच वाढलंय.
राज्यात सध्या 2100 मेगावाट विजेचा तुटवडा असल्याने शहरी भागात सहा तास तर ग्रामीण भागात दहा ते बारा तास लोडशेडिंग करण्यात येत आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहणार असल्यानं लोडशेडिंगचे आणखी चटक सामान्य जनतेला सहन करावे लागणारेत.
दरम्यान कोळसा खाणींमध्ये पाणी गेल्यामुळं वीज निर्मितीला फटका बसल्याचा दावा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. लोडशेडिंगची समस्या तात्पुरती असून 15 दिवसांत सुरळीत होणार असल्याचा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केलाय. मात्र दिवाळीच्या काळात लोडशेडिंग होणार नसल्याचं आश्वासन बावनकुळेंनी दिलंय. तर सरकारला कोळशाचा साठा सांभाळता न आल्यामुळंच लोडशेडिंगची समस्या उदभवल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलीय.
या शहरांमधलं भारनियमन तात्पुरतं मागे
राज्यामधल्या मोठ्या शहरांतल्या रहिवाशांना दिलासा देणारी बातमी आता पाहूया. मोठ्या शहरांतलं भारनियमन तात्पुरतं मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई पूर्व उपनगरातल्या मुलुंड, भांडूप, तसंच ठाणे, नाशिक आणि पुणे शहरांमधलं भारनियमन तात्पुरतं मागे घेतलं जाणार आहे. मोठ्या शहरांमधलं भारनियमन कमी करण्यासाठी बाहेरून वीज घेण्यात आली आहे. मात्र इतर ठिकाणचं म्हणजेच ग्रामिण आणि निमशहरी भागातलं भारनियमन सुरुच राहणार आहे. राज्यात सध्या एकवीसशे मेगावॅट विजेचा तुटवडा आहे.