विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीड जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावात ही घटना घडली असून दोघांची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:हून पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंजरथ इथल्या काळे वस्तीवर पांडुरंग दोडतले कुटुंबासह राहतो. आज पहाटे साखर झोपेत असणाऱ्या पत्नी लक्ष्मी आणि मुलगा पिल्या या दोघांची पांडुरंगने तीक्ष्णहत्याराने हत्या केली. पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतलेने ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.पहाटेच घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन आरोपी पांडुरंग दोडतले यास अटक केली. 


आरोपी पांडुरंग याची पत्नी लक्ष्मी दोन महिन्यांपासून कौटुंबिक वादामुळे माहेरी लहामेवाडी इथं आपले वडील शिरू गणपती शेंडगे यांच्याकडे राहत होती. रविवारी शिरु शेंडगे हे ऊसतोडणीच्या कामाला गेल्याने त्यांनी आपली मुलगी लक्ष्मीला पुन्हा तिच्या नवऱ्याकडे आणून सोडलं. आज पहाटेच्या सुमारास लक्ष्मी आणि मुलं साखर झोपेत असताना पांडुरंगने लक्ष्मी आणि पाच वर्षांच्या मुलाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात ते दोघं जागीच ठार झाले. हत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.