धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी ठिय्या,वाल्मिक कराडला मुंडेंचा आशीर्वाद?
Beed Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढतोय.
Beed Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरण दिवसेंदिवस तापतंय. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षी नेत्यांनी एकमुखी मागणी केलीय. त्यानंतर आता अंजली दमानियांनी थेट बीडमध्ये धरणं आंदोलन सुरू केलंय. यावर आता धनंजय मुंडे कधी मौन सोडणार हे पाहावं लागणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय.. सर्वपक्षीय नेत्यांनी मुंडेंच्या राजीनामासाठी एकमुखी मागणी केल्यानंतर आता अंजली दमानिया आक्रमक झाल्यात.. सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी दमानियांनी लावून धरलीय.. त्यासाठी त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीतोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यानी केलाय.
महाराष्ट्रात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय. धनंजय मुंडेंसारखे आणि नेते राज्यात फिरतात त्यांना आळा घालण्यासाठी आपण लढा उभारल्याचं अंजली दमानिया म्हणाल्यात. तर दुसरीकडे फरार तीन आरोपींचा खून झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता.. त्याबाबत पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवलीय..त्यांनी आरोपींबाबत केल्या विधानाचे पुरावे द्यावेत अशी नोटीस पोलिसांनी पाठवलीय. त्यावरही दमानियांनी उत्तर दिलंय.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढतोय. त्यामुळे आता यावर धनंजय मुंडे कधी मौन सोडणार आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
पोलीस ठाण्यात तक्रार
बीडमध्ये काल सर्वपक्षीय मोर्चादरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या शाब्दिक हाल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी असभ्य पद्धतीने भाषणं केली, तसंच हातवारे केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय.
'माहिती कोण पुरवत?'
अंजली दमानिया यांना पोलीस नजर कैदेत ठेवावं.अन्यथा त्यांना जिल्ह्यातून बाहेर पाठवावं अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे नेते अविनाश नाईकवाडे यांनी केलीये.दमानिया यांच्याकडे कुठली माहिती येते कुठून आणि त्यांना माहिती कोण पुरवत यांची देखील पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं असल्याचं नाईकवाडे यांनी म्हटलंय.