बाप रे बाप...केवढी मोठी विहीर! जी तुम्ही या पूर्वी कधीही पाहिली नसेल
बळीराजाचा नाद करायचा नाय ! 2 कोटी खर्चून 202 फुटांची विहीर
विष्णु बुरगे, झी २४ तास, बीड : कुणाचं नशीब कधी फळफळेल, सांगता येत नाही. बीडच्या मारोती बजगुडे या शेतक-याचं नशीब असंच फळफळलं आणि त्यानं चक्क आपल्या एक एकर शेतात महाकाय विहीर बांधली. बीडच्या दुष्काळी भागातली ही विहीर. पण यंदा चांगला पाऊस झाला आणि ही विहीर तुडुंब भरली.
आता एवढी मोठी विहीर बांधण्याचं कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? त्याचं झालं असं की, औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम बीडमध्ये सुरू झालं. गेवराई तालुक्यातल्या पाडळसिंगी गावातले मारुती बाजगुडे यांची एक एकर जमीन रोड बनवणा-या IRB कंपनीनं गौण खनिज खोदकामासाठी घेतली. इथला मुरूम आणि खडक
रस्त्याच्या कामात वापरण्यात आला.. त्यापोटी बाजगुडेंना लाखो रुपयांचा मोबदलाही मिळाला.रस्त्याचं काम झाल्यानंतर बाजगुडेंच्या शेतात मोठी खदान तयार झाली. बाजगुडे यांनी शक्कल लढवली. त्यांनी या खदानीला सगळ्या बाजूंनी कठडा बांधून घेतला. तब्बल दोन कोटी
रुपये खर्चून तयारी झाली २०२ फूट रूंद आणि ४१ फूट खोल विहीर. त्यात कधी नव्हे तो यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडला. आणि ही एक एकरातली विहीर पाण्यानं तुडुंब भरली. मारूती बाजगुडे यांच्याकडं बारा एकर जमीन आहे. कोरडवाहू शेती करणारे बाजगुडे आता पाणी आल्यानं बागायतदार शेतकरी झाले आहेत. सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी परिस्थिती असते.
सरकारी कामासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला अनेकांना वर्षानुवर्षे मिळत नाही. पण मारूतीरावांची बातच न्यारी. त्यांनी मोबदला तर पदरात पाडून घेतलाच. शिवाय मोकळ्या खदानीचं रुपांतर महाकाय विहिरीत केलं.